वृत्तसंस्था/ युमेग (क्रोएशिया)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या क्रोएशिया खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेकच्या जिरी लिहेकाने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना ऑस्ट्रियाच्या डॉम्निक थिएमला पराभवाचा धक्का दिला. त्याचप्रमाणे या स्पर्धेत स्वीसच्या वावरिंकाने आपला सामना जिंकून पुढील फेरीत स्थान मिळविले.
गुरुवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात लिहेकाने थिएमवर 6-3, 7-5 असा सेट्समध्ये मात केली. हा सामना 100 मिनिटे चालला होता. 21 वर्षीय लिहेकने पहिल्यांदाच या स्पर्धेत आपला सहभाग दर्शवला आहे. आता लिहेक आणि मॅटो अॅमेल्डी यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. दुसऱ्या एका सामन्यात स्वीसच्या वावरिंकाने अर्जेंटिनाच्या कोरियाचे आव्हान 7-5, 6-1 असे संपुष्टात आणत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. वावरिंकाचा पुढील फेरीत सामना रॉबर्टो बायेनाशी होणार आहे. बायेनाने डॅनियलचा 6-3, 6-1 असा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अन्य एका सामन्यात मुनेरने मेरोझसेनवर 6-4, 6-3 तसेच द्वितीय मानांकित सोनेगोने सेचिनातोवर 6-1, 7-6(7-5) अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.









