सोन्याचे दागिने, मोटारसायकलसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त : उद्यमबाग पोलिसांची कारवाई
बेळगाव : चन्नम्मानगर येथे वृद्धेच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून दागिने पळविणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात उद्यमबाग पोलिसांना यश आले आहे. स्वागत रघुनाथ ढापळे (रा. शास्त्रीनगर, दुसरा क्रॉस शहापूर) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे 52 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत 27 जानेवारी 2025 रोजी चन्नम्मानगर सेकंड स्टेज येथे घरात एकाकी असलेल्या वृद्धेच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून सोन्याचे दागिने दिवसाढवळ्या पळविण्यात आले होते. या घटनेमुळे बेळगावात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली होती. पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून तपास पथक या चोरट्याच्या मागावर होते. शेवटी मंगळवारी या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून 52 ग्रॅम वजनाचे अंदाजे 3 लाख 50 हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली हिरोहोंडा कंपनीची फॅशन प्लस मोटारसायकल अंदाजे किमत 50 हजार रुपये असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.









