शिष्टमंडळास मुख्यमंत्र्यांची ग्वाही
प्रतिनिधी/ पणजी
बार्देश तालुक्यातील सांगोल्डा येथील कोमुनिदाद जमिनीत बांधण्यात आलेली 12 बेकायदेशीर घरे न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात आल्यानंतर शनिवारी आमदार केदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक सरपंच आणि काही रहिवाशांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन या विषयावर सहानुभूतीने विचार करावा, असे आवाहन केले.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सध्या आचारसंहिता चालू असल्याने निवडणुकीनंतरच विचार होईल, असे सांगितले. तरीही मानवतेच्यादृष्टीने या लोकांचे वास्को येथे पुनवर्सन करता येईल, किंवा त्यांनी एखादी जागा भाडोत्री घेतली असल्यास त्याचे भाडे फेडण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
मात्र मुख्यमंत्र्यांचा पुनर्वसन प्रस्ताव त्यांनी अमान्य केला. तेथे जाणे कामधंदा किंवा मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नसल्याचे स्पष्ट केले. ही जागा सोडून आम्ही कुठेच जाणार नाही, असेही ते म्हणाले.
शुक्रवारी जेव्हा घरे पाडण्याची कारवाई सुरू होती तेव्हा काही संतप्त लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. त्यासंबंधी शिष्टमंडळास विचारले असता, सध्या आम्ही केवळ चौघेच मुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत. त्यामुळे त्या विषयावर सर्व लोकांशी चर्चा केल्यानतंरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सरपंच नीळकंठ नाईक यांनी बोलताना, मुख्यमंत्र्यांनी शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. सध्या त्यांना कुठेतरी स्थलांतरीत आणि पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येणार असून सर्वमान्य तोडगा काढण्यात येईल, असे नाईक यांनी सांगितले.