आता संपवायचा अधिकार आमचाच : निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत
शस्त्रसंधीला मान्यता देणे हे जसे आमच्या फायद्याचे होते, त्यापेक्षा ते पाकिस्तानच्या अधिक हिताचे होते. मात्र, बेभरवशी पाकितानने अवघ्या चार तासांत या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत स्वत:च्या पायावर दगड मारून घेतलाय. त्यांनी पुन्हा सुरू केलंय. आता ते संपवायचा पूर्ण अधिकार आमचाच असल्याचे उद्गार निवृत्त एअर चिफ मार्शल हेमंत भागवत यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना काढले. मात्र, पाकिस्तानकडून ही शस्त्रसंधी तोडण्यामागची कारणेही जाणून घ्यावी लागतील, असेही ते म्हणाले.
सीझ फायरचे उल्लंघन करण्यामागच्या पाकिस्तानच्या भूमिकेची कारणमीमांसा करताना हेमंत भागवत म्हणतात, शस्त्रसंधी उल्लंघनामागे दोन-तीन कारणे असू शकतात. त्यातील एक कारण म्हणजे, शस्त्रसंधी मान्य करायचा निर्णय हा उच्चस्तरावरील लष्करी आणि राजकीय अधिकारी पातळीवर घेतला जातो. पाकिस्तानमध्ये असे आहे की, आर्मी हेडक्वार्टरने मानले तरच पुढे तेथील राजकीय नेतृत्व त्यासाठी होकार किंवा नकार देऊ शकते. पण पाकिस्तानच्या बाबतीत आणखी एक मुद्दा असा आहे की, पाकिस्तानी लष्करो दोन मतप्रवाह आहेत. पूर्वी पाकिस्तानी आर्मी प्रोफेशनल होती. जनरल झियांनी त्याचे इस्लमायझेशन केले. त्यामुळे ही आर्मी दोन गटात विभागली गेली. त्यामुळे असे असू शकते की, त्यांचा एक विभाग हा शस्त्रसंधीसाठी सहमत आहे आणि दुसरा विभाग नाही. त्यामुळे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे हे असे उल्लंघन होऊ शकते.
उत्तर चक्रवाढ व्याजाने द्यायला हवे!
शस्त्रसंधी उल्लंघनामागचा दुसरा मुद्दा असा आहे की, पाकिस्तान या युद्धासाठी आपल्या सैनिकांसोबत मुजाहिदीनांचाही वापर करून घेत आहे. या मुजाहिदीनांचे छोटेछोटे ग्रुप बनवायचे, त्यांच्याकडे ड्रोन आणि कमी वजनाची घातक शस्त्रs द्यायची आणि त्यांना पुढे पाठवायचे. संधी मिळाली की घुसा आणि विध्वंस करा, असे त्यांना निर्देश दिलेले असतात. हे मुजाहिदीनांचे ग्रुप पाकास्तानी आर्मीशी संपर्क न ठेवता आपल्या कार्याला अंजाम देत असतात. वॉकीटॉकी किंवा मोबाईलद्वारे आर्मीसोबत संपर्क ठेवणे त्यांच्या दृष्टीने घातक ठरू शकते. कारण जर त्यांनी संपर्क केला तर भारतीय सिग्नल कोअरकडून त्यांचे मेसेज वा संभाषण पकडले जाण्याची भीती असते. त्यामुळे सीमेलगत दबा धरून बसलेले मुजाहिदीन हे कुणाच्याही संपर्कात नसतात. त्यामुळे सीझफायर म्हणजेच शस्त्रसंधी झाली हे समजायला कदाचित वेळ लागला असेल. म्हणूनच त्यांनी आपले हल्ले सुरुच ठेवले असण्याची शक्यता नाकराता येत नाही. मात्र, ही जरी एक बाजू असली तरी या पाकिस्तानवर विश्वास ठेवणे हेदेखील खूप धोक्याचे आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानसारखा बेभवरशी देश जगाच्या पाठीवर अन्य कुठेही नाही. त्यामुळे जशास तसे नव्हे तर पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला चक्रवाढ व्याजाने प्रत्युत्तर देणे अत्यंत गरजेचे असल्याचेही भागवत म्हणाले.
आमच्या नादी लागू नका, हा मेसेज जगाला पोहोचला!
भारताच्या एकूण भूमिकेबद्दल बोलताना हेमंत भागवत म्हणतात, पाकिस्तानच्या आगळीकीला प्रत्युत्तर देताना आपण त्यांच्या नऊ ठिकाणी जोरदार हल्ले करून जबरदस्त प्रतिशोध घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आमचा बदला पूर्ण झाला. आम्हाला हे युद्ध वाढविण्यात अजिबात इंटरेस्ट नसल्याचाही मेसेजदेखील त्यांना दिला. त्यांचे जे अतिरकी मारायचे होते तेदेखील आपण मारले. आमचा प्रतिशोध संपला. मात्र पाकिस्तानचा कायमस्वरुपी विध्वंस करणे हे लिहिणे, बोलणे सोपे असते. पण आपल्याही हिताच्या दृष्टीने ते संयुक्तिक मुळीच नाही. पूर्णत: विस्कटलेले देश शेजारी असणे हे आपल्या देशाच्या दृष्टीनेही फार धोक्याचे ठरू शकते.
भारताच्या दृष्टीने भारताची सध्याची ग्रोथ अजिबात थांबता उपयोगाची नाही. त्याचबरोबर अशा घटनांमधून सर्व जगाला योग्य तो मेसेज द्यायचा असतो. तूर्त पाकिस्तानसहीत चीन, बांगलादेश, श्रीलंका या शेजाऱ्यांना योग्य मेसेज आपण दिलाच आहे. पण उर्वरित जगालादेखील हा भारत पूर्वीचा भारत राहिलेला नाही. आमच्या नादी लागाल तर ‘घुस के मारेंगे’ हादेखील मेसेज देण्यात आपण यशस्वी ठरल्याचे भागवत यांनी सांगितले.









