सातारा :
बाप्पांचे वाजतगाजत जल्लोषात निरोप देण्याचा कार्यक्रम भाविकांनी पार पाडला. परंतु विसर्जन सोहळ्यानंतर कृष्णा नदी पात्राकडे हिंदूत्ववादी संघटनांनीच जाऊन पाहणी केली असता त्यांना राहावले नाही. लगेच मूर्तींसाठी मोहीम आखून नदीपात्राबाहेर आलेल्या मूर्ती संकलित करून पुन्हा त्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये केवळ हिंदूत्ववादीच नव्हे तर पर्यावरणप्रेमींचाही मोठा सहभाग होता. गेली दोन दिवस ही मोहीम सातारा तालुक्यातील संगम माहुली आणि वाई येथे राबवण्यात आली.
सातारा तालुक्यातील संगममाहुली येथे गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. विसर्जन सोहळा पार पडल्यानंतर हिंदूत्ववादी कार्यकर्ते व सामाजिक पर्यावरणप्रेमींनी संगममाहुली येथे पाहणी केली असता नदीचे पाणी कमी झाल्याने विसर्जन केलेल्या नदीपात्रातील गणेशमूर्ती या नदीपात्राच्या कडेला तशाच भग्न अवस्थेत दृष्टीस पडल्या. त्यांना हे विदारक चित्र पाहून लगेच त्यांनी सोमवारी आणि मंगळवारी मोहीम राबवून संगममाहुलीच्या घाटाची स्वच्छता केली. यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, गुरु अॅकॅडमी, संगम माहुली ग्रामपंचायत यांच्यावतीने संयुक्तपणे त्या मूर्तींचे पूनर्विसर्जन करण्यात आले.








