दिवाळीच्या प्रकाश पर्वाला आजपासून प्रारंभ : बाजारात पंचमुखी, कमळ, लामणदिवा प्रकारात पणत्या उपलब्ध : खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
बेळगाव : दिवाळीच्या प्रकाश पर्वाला आज वसुबारसपासून प्रारंभ होत आहे. आता पुढील चार दिवस दिव्यांच्या झगमगाटाने शहर उजळणार आहे, विविध प्रकारच्या सुहासांनी दरवळणार आहे. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’, असे म्हटले जाते, ते खरेच आहे. वर्षभरातील हा सर्वात मोठा उत्सव. तो तितक्याच उत्साहाने, आनंदाने साजरा करण्यात येतो. नवरात्र झाली की दिवाळी कधी येते याची प्रतीक्षा सर्वांनाच असते. या उत्सवाची पहिली चाहूल लागते ती पणती आणि टांगलेल्या आकाश कंदिलामुळे. अलीकडच्या काळात सजावटीला (सेलिब्रेशनला) भलतेच महत्त्व आले आहे. बाजारपेठेने ग्राहकांची मानसिकता अचूक ओळखली आहे. त्यामुळे पारंपरिक साहित्याबरोबरच सजावटीच्या वस्तुंना मागणी असते. पूर्वी फक्त मातीच्या पणत्या उपलब्ध असत. सजावट या एका शब्दाने आपल्या अनेक वस्तुंचे स्वरुपच पालटले. मातीच्या पणत्यांवर रंगकाम तर करण्यात आलेच परंतु त्यांच्या आकारामध्येही वैविध्य आणण्यात आले.
पूर्वीच्या एका साध्या पणतीचे आज सजावटीमुळे देखणे रुप झाले आहे. पणत्यांना रंगकाम तर केले जात आहे. शिवाय त्यावर जरीवर्क, जरदोजीवर्कने त्यांचे रुप खुलविण्यात आले आहे. मणी, मोती, बिडस् याने पणत्यांना सजविल्याने त्या लक्षवेधी ठरल्या आहेत. यामध्ये पंचमुखी, कमळ, लामणदिवा असे विविध प्रकार पहायला मिळत आहेत. पण त्यांच्या बरोबरच त्या ठेवण्यासाठी विशिष्ट नक्षीकाम केलेले छेटे चौकोनही मिळत आहेत. पणती प्रकाश तर देते पण तिचे स्वरूप अधिक खुलविण्यासाठी तिच्या भोवती रांगोळीही काढण्यात येते. दररोज वापरल्या जाणाऱ्या रांगोळीमधूनच एखादा कलाविष्कार साकारत त्यावर त्यामध्ये रंग भरून मधोमध पणती ठेवल्याने रांगोळी, पणती या दोघांचेही सौंदर्य खुलते. याशिवाय मणी, मोती लावून विविध नक्षी कामाच्या तयार रांगोळीसुद्धा उपलब्ध आहेत.
महिलांना मोठा रोजगार
साधारण महिलावर्ग पणत्यांच्या सजावटीमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. पूर्वी केवळ नवरात्र आणि दिवाळीमध्ये पणत्यांचा वापर होत असे. परंतु आज गृहसजावटी बरोबरच आस्थापनांमध्ये पणत्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे वर्षभर आपल्याला सहजपणे पणत्या उपलब्ध असतात. मुख्य म्हणजे यामुळे महिलांना मोठा रोजगार प्राप्त झाला असून त्यांचा वेळही सत्कारणी लागत आहे. पणत्यांच्या बरोबरच दीपमाळ आणि सात, पाच, एक अशा क्रमाने पणत्यांचे कमळही पाहायला मिळते. रांगोळीच्या मधोमध यातील सर्व पणत्या प्रज्वलित केल्यावर परिसर प्रकाशमान होतो व हे दृष्यसुद्धा विलोभनीय दिसते. आज पणत्यांचे स्वरूप बदलले. परंतु पारंपरिक मातीच्या पणतीला आजही तितकेच महत्त्व आहे. दीपोत्सवासाठी याच पणत्या वापरल्या जातात. अंधाराचा भेद करून परिसर उजळविणे हा पणती लावण्याचा मुख्य हेतू. साधेपणापासून कलासक्त सौंदर्यापर्यंत पणत्यांचा प्रवास झाला असला तरी प्रकाश देणे हा तिचा हेतू चिरंतन आहे आणि हेच तिचे वैशिष्ट्या आहे









