भारताच्या अनेक हिस्स्यांमध्ये अशा परंपरा आहेत, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर दंग व्हायला होते. मध्यप्रदेशात एक असा समुदाय आहे, ज्याच्या परंपरा अत्यंत अजब आहेत. मध्यप्रदेशात भगोरिया नावाचा महोत्सव साजरा करण्यात येतो.
भगोरिया महोत्सवात युवक स्वतःहून स्वतःच्या पसंतीच्या युवतीवर रंग टाकतो, त्यानंतर ही युवती त्या युवकाच्या चेहऱयाला गुलाल लावते. दोघांनाही परस्परांशी विवाह करायचा असेल तरच ही प्रक्रिया होते. दोघांचाही होकार असल्यास ते पळून जातात. दोघेही युवकाच्या घरी किंवा त्याचा नातेवाईक किंवा त्याच्या एखाद्या मित्राच्या घरी जातात. त्यानंतर स्वतःच्या कुटुंबाच्या सहमतीने होळीच्या आसपास दोघेही विवाह करतात.
मध्यप्रदेशातील तीन आदिवासी जिल्हे अलीराजपूर, झाबुआ आणि शहडोलमध्ये आयोजित होणाऱया भगोरिया हाटमध्ये हा प्रकार दिसून येतो. होळीच्या 7 दिवसांपूर्वी आयोजित होणारा भगोरिया हाट हा भील समुदायाचा सण आहे.
भगोरिया या शब्दाची उत्पत्ती ‘भाग जाने’मधून झाली आहे. याचा अर्थ पळून जाणे असा होतो. तर राजा भगोरेने या क्षेत्रावर विजय प्राप्त केल्यावर स्वतःच्या सैन्याला त्याच्या पसंतीच्या मुलीसोबत हाटमध्ये पळून जाण्याची अनुमती दिली होती. तेव्हापासून दरवर्षी कुठल्या न कुठल्या रुपात या परंपरेचे पालन केले जात असल्याचे स्थानिक लोकांचे सांगणे आहे.
कारण कुठलेही असो या समुदायात तरुण-तरुणींना स्वतःचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे. भगोरिया उत्सवात जर मुलीला मुलगा पसंत नसेल तर ती रंग लावून पुढे जात असते.









