राजद-काँग्रेसवर पंतप्रधान मोदी यांचा घणाघात
वृत्तसंस्था / पाटणा
भारताच्या विकासात बिहार महत्वाची भूमिका साकारणार आहे. मात्र, त्यासाठी बिहारच्या जनतेने सातत्याने विकासभिमुख सरकार निवडण्याची आवश्यकता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारची सूज्ञ जनता पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारलाच निवडून देईल, असा मला विश्वास वाटतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये केले. या राज्याच्या सिवान येथे आयोजित एका जाहीर सभेत ते भाषण करीत होते. हा कार्यक्रम शुक्रवारी होता.
बिहारमध्ये ज्यांनी जंगलराज आणले त्यांना जनता जवळ करणार नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे नाव न घेता केली. काँग्रेसच्या ‘लायसेन्स राज’मुळे देश गरीबीच्या खाईत लोटला गेला. आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणाप्रमाणे चालत आहोत. तथापि, राष्ट्रीय जनता दलाचे धोरण ‘परिवारका विकास’ असे आहे. आज हेच पक्ष या ना त्या मार्गाने बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जनतेने त्यांचा हेतू ओळखला पाहिजे. तसा तो लोक ओळखतील अशी मला शाश्वती आहे. बिहारचा विकास सातत्यपूर्ण पद्धतीने व्हायचा असेल, तर सातत्य टिकविणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाहीच्या लोकांनी पुन्हा संधी द्यावी. अन्यथा विकासाचा हा प्रवास खंडित होईल, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
आजच्या युवकांना ते माहित नाही
बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येण्यापूर्वी स्थिती किती दयनीय होती, हे आजच्या युवकांना माहीत नाही. कारण दोन दशकांपूर्वी बिहारच्या जनतेने जंगलराज संपविले आहे. ते पुन्हा आणू नका, असे माझे आवाहन आहे. प्रगतीची गंगा अशीच पुढे चालवायची असेल, तर विकास साधणारे सरकारच परत निवडून देणे आवश्यक आहे, असे महत्वाचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
भारताच्या प्रगतीचे विदेशात कौतुक
मी जेव्हा जेव्हा विदेशात जातो, तेव्हा तेथे भारताच्या प्रगतीचे कौतुक होत असलेले पाहून मला अभिमान वाटतो. लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे, हा विश्वास इतर देशांमधील नेतेही व्यक्त करताना दिसतात. ही बाब सर्व भारतीयांसाठी समाधानकारक आहे. भारताच्या या विकासात बिहारचा वाटा मोठा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सिवानमध्ये प्रकल्पांचा प्रारंभ
जाहीर भाषणापूर्वी त्यांनी सिवानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 विकास प्रकल्पांचा प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पांसाठी 5 हजार 900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे सिवान आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील जनतेचा लाभ होणार आहे. हे प्रकल्प प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित आहेत. मार्ग, सेतू, जलकुंभ, जलवाहिनी आदींचा त्यांच्यात समावेश आहे.
ओडिशामध्ये भव्य रोड शो
गेल्या वर्षी प्रथमच भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार ओडिशा राज्यात निवडून आले आहे. या सरकारच्या स्थापनेला 19 जूनला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. राजधानी भुवनेश्वरमध्ये या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. त्याला जनतेचा भव्य प्रतिसाद लाभला. मार्गाच्या दोन्ही बाजूंना उभ्या असणाऱ्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिवादन करीत होते. या रोड शो मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, तसेच राज्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार उपस्थित होते. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले होते.









