भारत व पाकिस्तान यांच्यात यंदाच्या आशिया चषकात आतापर्यंत 2 लढती झाल्या असून त्यातील साखळी फेरीतील लढत भारताने 5 गडी राखून जिंकली तर सुपर-4 फेरीत पाकिस्तानने त्याच फरकाने विजय मिळवत मागील हिशेब चुकता केला. सुपर-4 फेरीअखेर गुणतालिकेतील पहिले 2 संघ फायनलमध्ये पोहोचणार असून सर्व संघांसमोर काय आव्हाने असतील, त्याची झलक.
1) भारत ः दोन्ही लढती उत्तम फरकाने जिंकण्याची आवश्यकता
सुपर-4 फेरीतील श्रीलंका व अफगाण या दोन्ही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध होणाऱया लढतीत उत्तम फरकाने विजय मिळवल्यास भारताला सहजपणे अंतिम फेरीत पोहोचता येईल. भारताची सध्याची धावसरासरी -0.126 इतकी असून या निकषावर श्रीलंका (+0.589) व पाकिस्तान (+0.126) हे दोन्ही संघ सरासरीत अव्वल आहेत. अफगाणची सरासरी -0.589 इतकी आहे.
1) पाकिस्तान ः आणखी एक विजयही पुरेसा
यापूर्वी सलामी लढतीत भारताला नमवले असल्याने उर्वरित 2 लढतीत पाकिस्तानला अगदी एक विजय देखील पुरेसा ठरणार आहे. 1 सामना कमी फरकाने गमवावा लागला तरी उर्वरित 1 सामना जिंकत पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचू शकेल. दोन्ही लढती गमवल्या तर मात्र त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
3) श्रीलंका ः पाकिस्तानप्रमाणेच एका विजयाची आवश्यकता
4 गुणांवर झेप घेण्यासाठी लंकेला पाकिस्तान किंवा भारताविरुद्ध एक विजय मिळवण्याचे आव्हान असेल. फक्त एक सामना जिंकता आला तर धावसरासरीवर त्यांना लक्ष ठेवावे लागेल. दोन्ही सामने जिंकले तर ते अगदी सहज अंतिम फेरीत पोहोचतील.
4) अफगाण ः दोन्ही सामने जिंकण्याची गरज
भारताप्रमाणेच अफगाणला देखील उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरच फायनलमध्ये पोहोचण्याची अपेक्षा करता येईल. उर्वरित दोन सामन्यात एक पराभव पत्करावा लागला तरी त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचा धोका असेल.
आशिया चषक सुपर-4 फेरीतील गुणतालिका
संघ / सामने / विजय / पराभव / गुण
श्रीलंका / 1 / 1 / 0 / 2
पाकिस्तान / 1 / 1 / 0 / 2
भारत / 1 / 0 / 1 / 0
अफगाण / 1 / 0 / 1 / 0









