कोकाकोला आणि पेप्सी ही पेये माहीत नाहीत, असे लहान मूलही सापडणार नाही, अशी खरेतर परिस्थिती आहे. जगाच्या पाठीवर सर्वाधिक खप असणारी सौम्य पेये म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा प्रकारची अनेक पेये उपलब्ध आहेत. पण त्यांना या दोन पेयांची सर येत नाही, अशी जागतिक भावना आहे.
पण या जगात दोन देश असे आहेत की जेथे ही पेये मिळतच नाहीत. उत्तर कोरिया आणि क्युबा अशी या देशांची नावे आहेत. ही दोन्ही पेये अमेरिकन आहेत आणि अमेरिकेचा हाडवैरी असणाऱ्या रशियातही ती मिळतात. पण या दोन देशांमध्ये ती औषधालाही मिळत नाहीत. याचे कारण अमेरिकेने या देशांवर घातलेले कठोर आर्थिक निर्बंध हे आहे. या दोन्ही देशांच्या आयातीवर आणि आर्थिक व्यवहारांवर अमेरिकेची सूक्ष्म दृष्टी असते. अमेरिका या देशांशी व्यापार करत नाही, त्यामुळे कोणतीही ही दोन पेये या देशांमध्ये मिळत नाहीत.
खरे तर, असे जगात 15 देश आहेत, की जेथे कोला आणि पेप्सी मिळत नाही. कारण या देशांवर अमेरिकेची वक्रदृष्टी आहे. पण अन्य 13 देशांमध्ये अवैध मार्गाने या पेयांची अनधिकृत आयात केली जाते. त्यामुळे भरमसाठ दरात ही पेये या देशांमध्ये काही प्रमाणात तरी उपलब्ध होतात. पण उत्तर कोरिया आणि क्युबा येथे मात्र, ती कोणत्याही मार्गाने मिळत नाहीत. त्यांना पर्याय म्हणून उत्तर कोरियात काळ्या रंगाचा सोडा विकला जातो. त्यावरच समाधान मानले जाते.
कोला आणि पेप्सी यांना इतके महत्व का ? याचे कारण असे मानले जाते की पेये प्रतिष्ठेची आहेत. ज्या देशात ही पेये अधिकृतरित्या उपलब्ध आहेत, तो देश सधन असल्याचे मानले जाते. त्या देशातील आर्थिक स्थितीचे मानक म्हणून या पेयांकडे बघितले जाते. हे योग्य की अयोग्य असा प्रश्न उपस्थित होत असला तरी सध्यातरी अशी परिस्थिती आहे, असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जाते.