मंदिर-मशीदपासून 150 मीटर अंतरापर्यंत बंदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत धार्मिक स्थळांच्या आसपास मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि स्मशानभूमींपासून 150 मीटरच्या कक्षेत मांसविक्रीची दुकाने सुरू करता येणार नाहीत. दिल्ली महापालिकेने 54 प्रस्तावांना मंजुरी दिली असून यात मांसविक्री परवाना धोरण देखील सामील आहे. नव्या धोरणच्या अंतर्गत कुठल्याही धार्मिक स्थळापासून 150 मीटरच्या कक्षेत मांसविक्रीचे दुकान थाटता येणार नाही. मशीद समिती किंवा इमामकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करत मशीदनजीक मांसविक्री करता येणार आहे. लोकांच्या धार्मिक भावना विचारात घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. या धोरणात मांसविक्रीपासून प्रक्रिया प्रकल्प, पॅकेजिंग किंवा स्टोरेज प्रकल्पासाठी परवाना देणे आणि त्याचे नुतनीकरणासंबंधी नवे नियम सामील आहेत. यानुसार परवान्याचे शुल्क देखील वाढविण्यात आले आहे. महापालिकेच्या नव्या परवाना धोरणाला मांसविक्रेत्यांनी विरोध दर्शविला आहे.









