आगामी मालिकेपूर्वी ज्यो रूटने इंग्लिश संघाला दिला इशारा
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा अव्वल फलंदाज ज्यो रूटने आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा सामना करताना सातत्य राखण्याची गरज व्यक्त केली आहे. अशा अजिंक्य प्रतिस्पर्ध्याचा सामना करताना लपण्यास जागा राहत नाही, असेही त्याने म्हटले आहे. भारत 2025-27 जागतिक कसोटी स्पर्धेची सुऊवात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने करणार असून 20 जून रोजी हेडिंग्ले येथे पहिल्या सामन्याची सुरुवात होईल. गेल्या वर्षी इंग्लंडचा सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू ठरून अॅलिस्टर कूकला मागे टाकणारा रूट अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय आव्हानासाठी सज्ज झाला आहे.
‘आम्ही आमच्या स्वत:च्या परिस्थितीत चांगले आहोत. पण भारत पाच सामन्यांच्या मालिकेसाठी येत असल्याने लपण्यास जागा राहणार नाही. तुम्हाला सातत्य ठेवावे लागेल. तुम्हाला विजयी कामगिरी वारंवार करावी लागेल, असे इंग्लंडच्या माजी कर्णधाराने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले आहे. 34 वर्षीय रूटने 2017 ते 2022 दरम्यान इंग्लंड कसोटी संघाचे नेतृत्व केले आणि 64 सामन्यांपैकी 27 जिंकण्यात यश मिळवले. त्या देशाच्या कोणत्याही कर्णधाराला इतके सामने जिंकता आलेले नाहीत.
तथापि, 2021 मधील कठीण काळानंतर त्याने पद सोडण्याचा निर्णय घेतला. पण तो अजूनही संघाचा फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील त्याच्या कामगिरीने ते पुन्हा सिद्ध झाले आहे. तिथे तो तीन डावांमध्ये एका शतकासह 225 धावा करून चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने चमक दाखवूनही इंग्लंडला चांगली कामगिरी करता आली नाही. ‘चॅम्पियन्स ट्रॉफी निराशाजनक होती. आम्ही आमच्या क्षमतेइनुरुप खेळलो नाही. परंतु त्या संघाकडे खूप प्रतिभा आहे’, असे त्याने म्हटले आहे.









