वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुगल व ऍमेझॉन या सारख्या मोठय़ा टेक कंपन्यांनंतर आता बाजारात टिकटॉक व याहू या कंपन्या देखील टाळेबंदी करण्याच्या तयारीत आहेत. उपलब्ध अहवालानुसार टिकटॉकने भारतातील सर्व कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकणार असल्याचे संकेत दिले असून त्याबाबत लवकरच कार्यवाही होईल. इतकेच नाही तर कर्मचाऱयांना गुलाबी रंगाच्या स्लिपही दिल्या आहेत.
तीन वर्षांपूर्वी टिकटॉकवर बंदी
मिळालेल्या माहितीनुसार, बाइट डान्स आणि सोशल मीडिया ऍप टिकटॉकच्या इंडिया ऑफिसचे कर्मचारी बहुतेक ब्राझील आणि दुबई मार्केटसाठी काम करत होते. टिकटॉकचा हा निर्णय आश्चर्यकारक नाही कारण टिकटॉकवर भारतात 3 वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती.
याहू 20टक्केपेक्षा जास्त कर्मचारी काढून टाकणार
याहू आपल्या एकूण जागतिक कर्मचाऱयांपैकी 20टक्के पेक्षा जास्त जणांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. खुद्द कंपनीने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. ज्यामध्ये कंपनीने म्हटले आहे की टाळेबंदीचा उद्देश मुख्यत्वे त्याच्या ऍड-टेक विभागाची पुनर्रचना करणे आहे. टाळेबंदीच्या या फेरीचा परिणाम वर्षाच्या अखेरीस जवळपास निम्म्या ऍड-टेक कर्मचाऱयांवर होईल. त्यापैकी सुमारे 1,000 कर्मचाऱयांना या आठवडय़ात कामावरून काढून टाकण्यात येणार आहे.
याहूने सांगितले की, कंपनीने आपल्या 12 टक्के कर्मचाऱयांना आधी काढून टाकण्याची योजना आखली आहे. यानंतर, कंपनी या वर्षाच्या उत्तरार्धात उर्वरित 8 टक्के कर्मचाऱयांना काढून टाकेल. तथापि, कंपनीने टाळेबंदीमुळे प्रभावित कर्मचाऱयांची संख्या उघड केलेली नाही.
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, अनेक जाहिरातदारांनी विक्रमी महागाई दर आणि मंदीच्या चिंतेमुळे त्यांचे जाहिरातीकरीताचे बजेट कमी केले आहे. एकंदर परिस्थितीनंतर कंपनीने आगामी काळासाठीची कपातीची योजना तयार केली आहे.
9 महिन्यांचा पगार देणार
टिक टॉकने कर्मचाऱयांना सांगितले आहे की, 28 फेब्रुवारी हा त्यांचा कंपनीतील शेवटचा दिवस असेल. वृत्तानुसार, कंपनीने असेही म्हटले आहे की काढून टाकलेल्या कर्मचाऱयांना 9 महिन्यांचा पगारदेखील दिला जाणार असल्याचे सांगितले आहे.









