योगी आदित्यनाथ यांचा दावा : वक्तव्याचे उलट-सुलट पडसाद
वृत्तसंस्था/ लखनौ
ज्ञानवापीच्या एएसआय सर्वेक्षणाबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी मोठे वक्तव्य केले. ज्ञानवापीला मशीद संबोधले तर वाद होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मुस्लीम समुदायाकडून ऐतिहासिक चूक झाली असून ती सुधारण्यासाठी त्यांच्याकडूनच प्रस्ताव आला पाहिजे असे ते म्हणाले. वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून 3 ऑगस्टला न्यायालयाचा अंतिम निर्णय येणार आहे. या पार्श्वभूमीवर आता योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्मयता आहे. दुसरीकडे, सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी पलटवार करत हे विधान वादाला खतपाणी घालणारे असल्याचे म्हटले आहे. तर, संत समाजाने मुख्यमंत्री योगींच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे.
ज्ञानवापी प्रकरणाबाबत भाष्य करताना मशिदीच्या आत त्रिशूल काय करत होते, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले. एएनआयच्या पॉडकास्टमध्ये ज्ञानवापीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मोठे वक्तव्य केले. ज्ञानवापीमध्ये आधीपासूनच देवांच्या मूर्ती आहेत, त्याठिकाणी ज्योतिर्लिंग, त्रिशूल आहे. हिंदूंनी या मूर्ती ठेवल्या आहेत का? मशिदीच्या आत त्रिशूल कसे आले? मला वाटते ज्याला देवाने दृष्टांत दिला आहे त्याने ते पाहावे असे सांगतानाच राज्य सरकारला आता तोडगा हवाय, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देश मत आणि धर्माने नव्हे तर संविधानाने चालवला जाईल. तुमचे मत, तुमचा धर्म तुमच्या पद्धतीने असेल, तुमच्या घरात असेल. तुम्ही कोण आहात हे तुम्ही इतरांवर लादू शकत नाही. कुणाला देशात राहायचे असेल, तर स्वत:चे मत, धर्म नव्हे, तर राष्ट्र हे सर्वोत्कृष्ट मानले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्याकडून प्रत्युत्तर
सीएम योगींच्या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देत सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 ची सर्व धार्मिक स्थळांची यथास्थिती स्वीकारली पाहिजे. मशिदीत मंदिर शोधण्याचे धाडस करणारे लोक या वादाला खतपाणी घालत आहेत. काही लोक वाद आणखी वाढवण्याची प्रथा सुरू करत आहेत, जर असेच चालू राहिले तर उद्या लोक या प्रथेनुसार मंदिरांमध्ये बौद्ध मठ उघडू लागतील, असा दावाही त्यांनी केला.
मशीद म्हणणे योग्य नाही, ते मंदिर आहे!
योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचे अखिल भारतीय संत समितीने स्वागत आणि समर्थन केले आहे. यासंबंधी समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रनंद सरस्वती यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यातून त्यांनी ज्ञानवापीचा संघर्ष दीर्घकाळ सुरू असून मुस्लीम समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. उर्दू-फारसी यापैकी कोणत्याही भाषेत ज्ञानवापी हा शब्द नाही. ज्ञानवापी म्हणजे ज्ञान आणि वापी म्हणजे ज्ञानाची विहीर. त्यामुळे मुस्लिमांनी ते हिंदूंच्या ताब्यात द्यावे, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, वाराणसीतील किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनीही योगींच्या वक्तव्याचे समर्थन केले.