पालकमंत्री जारकीहोळींची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : भाजप सरकारच्या कार्यकाळात कोरोना दरम्यान झालेल्या गैरकारभाराची सखोल चौकशी करणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. शहरामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भाजप कार्यकाळात मुख्यमंत्री बोम्माई यांच्या कार्यकाळात 40 टक्के कमिशनचे प्रमाण वाढले होते. कोरोना काळात वैद्यकीय साधनसामग्री खरेदी करण्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. याबरोबरच पाणीपुरवठा योजनांमध्येही गैरकारभार झाला आहे, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने कोरोना काळातील गैरकारभार मोठा असून त्याची सखोल चौकशी करण्याची प्रमुख मागणी आपणच केली होती. आता आपले सरकार सत्तेत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मागील सरकारच्या कार्यकाळात वैद्यकीय मंत्री असणारे नेते आता काँग्रेसमध्ये येणार का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, त्यांनी येतील न येतील हा दुसरा प्रश्न आहे. मात्र, कोरोना काळातील गैरकारभाराची चौकशी होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.









