नफ्यात तीनपट वाढ : अंदाजे 1 लाख कोटी रुपयांची कमाई होणार असल्याची माहिती
नवी दिल्ली :
देशांतर्गत बाजारातील उच्च किरकोळ किमती आणि विदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोलियम विपणन कंपन्यांना चालू आर्थिक वर्षात किमान एक लाख कोटी रुपयांचा करपूर्व नफा होणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 30 टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. त्याचबरोबर पेट्रोलियम कंपन्यांनी या काळात दर कमी केलेले नाहीत. मे 2022 पासून तेलाच्या किमती जैसे थे आहेत.
बुधवारी जारी केलेल्या नोटमध्ये क्रिसिलने म्हटले आहे की पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या चालू आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा कमवू शकतात. 2016-17 ते 2021-22 या आर्थिक वर्षात पेट्रोलियम कंपन्यांचा सरासरी ऑपरेटिंग नफा 60,000 कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये तो 33,000 कोटी रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला होता. हा अहवाल सार्वजनिक क्षेत्रातील तीन पेट्रोलियम कंपन्यांवर आधारित आहे.
पेट्रोलियम कंपन्या पैसे कसे कमवत आहेत?
पेट्रोलियम कंपन्या दोन व्यवसायातून पैसे कमवतात. प्रथम शुद्धीकरण आहे. यामध्ये त्यांना ग्रॉस रिफायनिंग मार्जिन मिळते. रिफायनरीच्या गेटवर मिळणाऱ्या उत्पादनाच्या किमतीतून कच्च्या तेलाची किंमत वजा करून मोजली जाते. दुसरा व्यवसाय म्हणजे पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेलची विक्री. यामध्ये त्यांना इंधन उत्पादनांवर मार्जिन मिळते.
रशियावर बंदी, डिझेलची मागणी वाढली
युक्रेनवरील हल्ल्यानंतर नैसर्गिक वायूसारख्या पर्यायी इंधनाच्या किमतीत झालेली वाढ आणि रशियन उत्पादनांवर इयूची बंदी यामुळे डिझेलची मागणी मजबूत राहिली. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही या कंपन्यांना उच्च किरकोळ किमती मिळालेल्या नाहीत. आर्थिक वर्षात कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 94 डॉलर होती.
मे 2022 पासून किरकोळ किमती बदललेल्या नाहीत. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना मजबूत रिफायनिंग मार्जिन असूनही मार्केटिंगवर प्रति लिटर 8 रुपये तोटा सहन करावा लागला, ज्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षासाठी त्यांच्या नफ्यावर परिणाम झाला.
अहवालात असे म्हटले आहे की या पेट्रोलियम कंपन्यांनी 2016-17 आणि 2022-23 दरम्यान त्यांची गुंतवणूक लक्षणीयरीत्या 3.3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. यामुळे त्यांचे एकूण कर्ज 2016-17 मधील 1.2 लाख कोटी रुपयांवरून दुप्पट होऊन 2.6 लाख कोटी रुपये झाले आहे. मात्र, या काळात त्यांचा नफा कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात पेट्रोलियम कंपन्यांची गुंतवणूक 54,000 कोटी रुपयांची असल्याचा अंदाज आहे.
एशियन पेंटस्चा नफा 1550 कोटी रुपयांवर
मुंबई : एशियन पेंटस् या रंग उत्पादक कंपनीने आपला 2023-24 आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील नफा जाहीर केला असून नफ्यात 52 टक्के इतकी वाढ कंपनीने नोंदवली आहे. कंपनीने जूनअखेरच्या तिमाहीत 1550 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधारावर उत्पन्नात 7 टक्के वाढ झाली असून ते 9 हजार 182 कोटी रुपयांवर पोहचले आहे.









