अतिरीक्त 145 टनची पडणार भर: 2027 पर्यंत कंपन्यांनी ठेवले उद्दिष्ट
वृत्तसंस्था/ कोलकाता
वाढत्या घर मागणीची दखल घेत सिमेंट उद्योग आता अधिक सक्रिय झाला असून येणाऱ्या काळामध्ये सिमेंट उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या तयारीत सिमेंट कंपन्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आगामी काळामध्ये सिमेंट उत्पादनामध्ये दमदार वाढ केली जाणार असल्याची माहिती आहे.
सिमेंट मागणीमध्ये घरांचा वाटा हा 60 ते 65 टक्के इतका आहे. म्हणजेच इतर क्षेत्रापेक्षा बांधकाम प्रकल्पांकरीता जास्तीत जास्त सिमेंटचा वापर केला जातो. याला अनुसरून सरकार पायाभूत सुविधांवरदेखील भर देत असून या ठिकाणी होणाऱ्या प्रकल्पांसाठीची सिमेंटची मागणी वाढती राहिली आहे. या वाढीव मागणीची गरज पूर्ण करण्यासाठी सिमेंट उत्पादक कंपन्या आता सक्रीय होणार आहेत. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत विविध सिमेंट कंपन्यांकडून 1.2 लाख कोटी ऊपयांच्या गुंतवणुकीतून 145 ते 155 दशलक्ष टन इतके अधिक सिमेंट उत्पादन घेतले जाणार असल्याची माहिती आहे.
भारत दुसऱ्या नंबरचा देश
सध्याला 570 दशलक्ष टन इतक्मया क्षमतेसह भारत हा जगातील दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक देश झाला आहे. सिमेंट उत्पादनामध्ये सध्याला चीन हा देश अग्रेसर आहे. आर्थिक वर्ष 2012 ते 2023 पर्यंत उत्पादनामध्ये 61 टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2012 मध्ये असणारे 353 दशलक्ष टन इतके उत्पादन आता 570 दशलक्ष टनवर पोहोचले आहे. 2022 मध्ये 32 दशलक्ष टन इतके सर्वाधिक वाढीव सिमेंटचे उत्पादन घेण्यात आले आहे. आगामी काळामध्ये कारखान्यांच्या विस्तारासह उत्पादनक्षमतेवरही कंपन्यांचा भर असणार आहे.









