मुंबईतील 26/11 हल्ला विसरू शकत नाही : पंतप्रधानांची ‘मन की बात’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या 107 व्या भागात पंतप्रधान मोदींनी रविवार, 26 नोव्हेंबर रोजी मुंबईतील भीषण हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्र्रद्धांजली वाहिली. 26/11 चा हल्ला आपण कधीही विसरू शकत नाही, असे ते म्हणाले. 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी देशावर सर्वात भयंकर हल्ला झाला होता याची आठवण करून देत आता आम्ही दहशतवादाशी धैर्याने लढा देत आहोत, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
भीषण सागरी हल्ल्याद्वारे 15 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. पण त्या हल्ल्यातून सावरण्याची ताकद भारताकडे असून देश आता पूर्ण धैर्याने दहशतवादाला चिरडत आहे. मुंबई हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना मी श्र्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या आपल्या वीर जवानांची आज देश आठवण करत आहे, असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच सोमवार 27 नोव्हेंबर हा गुऊ नानक देवजींचा प्रकाशपर्व असल्याचे सांगत त्याबद्दल पंतप्रधानांनी जनतेचे अभिनंदनही केले.
संविधान दिनाच्या शुभेच्छा
1949 या दिवशी संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली होती. 2015 साली संविधान दिन साजरा करण्याची कल्पना आपल्या मनात आली. त्यानंतर आम्ही प्रयत्न केले आणि तेव्हापासून दरवषी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या. जेव्हा प्रत्येकजण राष्ट्र उभारणीत सहभागी होतो तेव्हाच प्रत्येकाचा विकास होऊ शकतो, असे पंतप्रधान म्हणाले. संविधान निर्मात्यांच्या याच द्रष्टेपणाला अनुसरून भारताच्या संसदेने आता ‘नारी शक्ती वंदन कायदा’ संमत केल्याचे मला समाधान आहे, असेही ते म्हणाले.
उत्सव काळातील खरेदीबद्दल समाधानी
गेल्या महिन्यात पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये मी व्होकल फॉर लोकलवर म्हणजेच स्थानिक उत्पादने खरेदी करण्यावर भर देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दिवाळी, भाऊबीज आणि छठ दरम्यान देशात 4 लाख कोटींहून अधिक ऊपयांचा व्यवसाय झाल्याचे नमूद करत समाधान व्यक्त केले. या काळात भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आल्याचे ते म्हणाले.
देशातच लग्न करा!
आता लग्नांचा हंगाम सुरू होत आहे. काही व्यापारी संघटनांचा अंदाज आहे की या हंगामात सुमारे 5 लाख कोटी ऊपयांचा व्यवसाय होऊ शकतो. पण हल्ली काही कुटुंबात परदेशात जाऊन लग्न करण्याचा नवा ट्रेंड तयार होत आहे. याच पार्श्वभूमीवर जर आपण भारतीय भूमीवर, भारतातील लोकांमध्ये विवाह साजरे केले, तर देशाचा पैसा देशातच राहील, असा दावा पंतप्रधानांनी केला. तुमच्या लग्नात देशातील जनतेला काही सेवा करण्याची संधी मिळेल, लहान गरीब लोकही आपल्या मुलांना तुमच्या लग्नाबद्दल गौरवाने सांगतील, असे ते म्हणाले.
जलसंवर्धन करणे सर्वांची जबाबदारी
आजच्या 21 व्या शतकातील सर्वात मोठे आव्हान आहे ते जलसंधारण. पाण्याचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जेव्हा आपण सामूहिक भावनेने काम करतो तेव्हा आपल्याला यश मिळते. अमृत सरोवर हे सुद्धा याचे उदाहरण आहे. देशभरात 65,000 हून अधिक अमृत सरोवर बांधले गेले आहेत. या अमृत सरोवराचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना होणार आहे. अशा परिस्थितीत या अमृत तलावांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. भविष्यासाठी आपण सर्वांनी पाण्याचे संवर्धन केले पाहिजे, असे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.









