रेल्वेस्थानकावर केले जाणार बॅगचे वजन : एअरलाइन्सप्रमाणे लागू होणार नियम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वे एकीकडे प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधांसाठी अनेक प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे रेल्वेने एक नियम कठोरपणे लागू करण्याची तयारी केली आहे. हा नियम एअरलाइन्सप्रमाणेच असणार आहे. रेल्वे आता एअरलाइन्सप्रमाणे प्रवाशांच्या सामानाच्या वजनाला नियंत्रित करणार आहे. हा नियम पूर्वीपासून आहे, परंतु तो पूर्णपणे लागू करण्यात आला नव्हता. रेल्वेस्थानकांवर आता विमानतळाप्रमाणे अनुभव मिळवून देण्याची तयारी केली जात आहे.
निर्धारित करण्यात आलेल्या मापदंडानुसारच भारतीय रेल्वेतून प्रवास करताना प्रवासी स्वत:सोबत सामग्री नेऊ शकणार आहे. देशाच्या काही प्रमुख रेल्वेस्थानकांवर सामानाच्या वजनावर याच्याशी संबंधित मर्यादा कठोरपणे लागू करण्यात येईल. एअरलाइन्सप्रमाणेच रेल्वेप्रवासासाठी या नियमांना पूर्णपणे लागू करण्याची तयारी आहे. नियमानुसार प्रवासाच्या विविध श्रेणींमध्ये मोफत लगेज नेण्याची अनुमती वेगवेगळी असते.
फर्स्ट क्लास एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 70 किलोग्रॅमपर्यंत सामान नेण्याची अनुमती असेल. एसी सेकंड क्लासच्या प्रवाशांसाठी ही मर्यादा 50 किलोग्रॅम तर थर्ड एसी आणि स्लीपर क्लासच्या प्रवाशांकरता 40 किलोग्रॅमपर्यंत मर्यादा असणार आहे. जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वत:सोबत नेता येणाऱ्या सामानाचे वजन 35 किलोग्रॅमपर्यंत असू शकते.
अधिक सामान जोखिमीचे
सध्या उत्तर रेल्वे आणि उत्तर मध्य रेल्वेने या व्यवस्थेची सुरुवात लखनौ आणि प्रयागराज विभागाच्या प्रमुख स्थानकांमधून करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता प्रयागराज, मिर्झापूर, कानपूर, अलीगड जंक्शन या स्थानकांची ओळख पटविण्यात आली आहे. याचबरोबर लखनौ चारबाग, वाराणसी, प्रयागराज छिवकी, सुभेदारगंज, टूंडला, अलीगड, गोविंदपुरी आणि इटावाचाही यादीत समावेश आहे. हा नियम रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा दोन्हींसाठी आवश्यक आहे. कारण अनेकदा प्रवासी स्वत:सोबत अत्यंत अधिक सामग्री नेत असतात, यामुळे डब्यात बसण्यास आणि चालण्यास समस्या होते. अतिरिक्त लगेज सुरक्षेकरता जोखिमीचे असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.
बॅगचे वजन अधिक ठरल्यास दंड
रेल्वेस्थानकावर विमानतळाप्रमाणेच स्वत:च्या लगेजला बुक करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वजनाची बॅग किंवा ब्रीफकेस असल्यास दंडाची तरतूद आहे. रेल्वेनुसार निश्चित मर्यादेपेक्षा अधिक आणि बुकिंगशिवाय सामग्री आढळून आल्यास अधिक दराने शुल्क भरावे लागणार आहे. प्रवाशांना स्वत:सोबत 10 किलोपर्यंतची अतिरिक्त सामग्री नेण्याची सूट असेल. परंतु त्याहून अधिक लगेज बुक करावे लागणार आहे.
इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे तपासणी
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सामग्रीवरून नियम लागू करण्यासाठी रेल्वेस्थानकांवर इलेक्ट्रॉनिक लगेज मशीन्स बसविणार आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवेशापूर्वी प्रवाशांच्या बॅगचे वजन आणि त्याचा आकार तपासला जाईल. प्रवाशांच्या सामग्रीचे केवळ वजनच नव्हे तर ट्रॅव्हल बॅगच्या आकारालाही या कक्षेत ठेवले जाणार आहे. जर बॅगचा आकार गरजेपेक्षा अधिक असल्यास दंड ठोठावला जाऊ शकतो.









