कागदाचा पुरवठा नसल्याने छापखाने बंद
प्रतिनिधी/ बेळगाव
एकीकडे 16 मेपासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग धडपडत असताना दुसरीकडे मात्र कागदाचा पुरवठा नसल्याने पाठय़पुस्तके छपाईचे काम ठप्प आहे. कागद नसल्याने कर्नाटक पाठय़पुस्तक प्रिंटर्स असोसिएशनने काम बंद करत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना यावषी वेळेत पाठय़पुस्तके मिळण्यास विलंब होणार आहे.
16 मेपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. यावषी 15 दिवस अगोदर शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात आतापर्यंत 45 टक्के पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असला तरी उर्वरित पुस्तके मात्र येण्यास विलंब होणार आहे. यावषी समाजशास्त्राच्या पुस्तकात काहीसा बदल करण्यात आल्याने ही पुस्तके शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर उपलब्ध होण्याची शक्मयता आहे.
युपेन व रशिया या दोन देशांच्या युद्धामुळे देशात कागदाचा तुटवडा जाणवत आहे. कागदच नसल्याने छपाई कशी करणार? असा प्रश्न प्रिंटर्ससमोर आहे. प्रिंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. आर. सत्यनारायण म्हणाले, कच्च्या मालाची टंचाई असल्याने पाठय़पुस्तके वेळेत छपाई होणार नाहीत, याची माहिती शिक्षणमंत्री व अधिकाऱयांना दिली आहे. 50 टक्के पुस्तकांची छपाई झाली असून उर्वरित छपाई होणे गरजेचे आहे. तामिळनाडू सरकारच्या अखत्यारित असलेल्या कागद कारखान्यांमधून जास्तीत जास्त पुरवठा होतो. कर्नाटक सरकारने शब्द टाकल्यास कागद पुरवठा सुरळीत होईल, असेही ते म्हणाले.
कर्नाटक पाठय़पुस्तक समितीने या बातमीचे खंडण केले आहे. कागद पुरवठय़ात आलेल्या व्यत्ययामुळे पाठय़पुस्तकांच्या वितरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी पाठय़पुस्तके उपलब्ध होतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.









