दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोऱ्यात पृथ्वीवरील सर्वात मोठे आणि आजपर्यंत तग धरुन असलेले महावन आहे. ते अमेझॉनचे वन म्हणूनच परिचित आहे. या वनातील घनदाट भागांमध्ये आजही भूमीपर्यंत सूयप्रकाश पोहचत नाही, इतकी प्रचंड वृक्षराजी येथे आहे. अशा दुर्गम वनप्रदेशात कधीकाळी मानवांनी गजबजलेल्या शहरांची मालिका होती, हे आज बऱ्याच जणांना खरेही वाटत नाही. तथापि, या ऐतिहासिक सत्यावरचा पडदा आता उचलला गेला आहे. अमेझॉनच्या या सदाहरित घनदाट अरण्यात एकेकाळी आठ शहरे वसविण्यात आली होती, असे संशोधकांना आढळले असून आता या शहरांच्या अवषेशांचा अभ्यास होत आहे.
अत्याधुनिक लेसर सेन्सॉर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या शहरांचा ठावठिकाणा शोधण्यात आला. अशी आठ शहरे आतापर्यंत दिसून आली आहेत. या शहरांमध्ये दाट मानववस्ती एकेकाळी होती. ही शहरे साधारणत. तीन हजार वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत अस्तित्वात असणाऱ्या ‘माया’ संस्कृतीचा भाग होती. इसवीसन पूर्व 500 वर्षे ते इसवीसन 300 ते 600 वर्षे अशा जवळपास 1 सहस्र वर्षांच्या कालावधीत या शहरांमध्ये उपानो नामक आदीम जातींचे लोक रहात होते. ही त्या काळाच्या मानाने चांगलीच प्रगत शहरे होती, अशी माहिती आतापर्यंत मिळाली आहे. या शहरांमधील लोकवस्ती 8 हजार ते 10 हजारपर्यंत असावी, असे अनुमान आहे. या शहरांच्या अभ्यासातून प्राचीन काळची शहररचना, शहर व्यवस्थापन आणि लोकजीवन यांची बहुमोली माहिती मिळेल अशी संशोधकांना अपेक्षा आहे.









