प्रतिनिधी / जळगाव :
आपल्या स्वागतासाठी रस्त्यावर दोन तास मुलांना उभे केल्याच्या प्रकाराची आपणास कोणतीही कल्पना नव्हती, असे नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
मंत्रीपदाची शपथ घेऊन प्रथमच आपल्या मतदारसंघात शुक्रवारी अमळनेरला आलेल्या अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या चिमुकल्या विदयार्थ्यांना रस्त्याच्या दुतर्फा उभे करण्यात आले होते. अनिल पाटील यांच्या गाडयांचा ताफा जात असताना या मुलांकडून चक्क सॅल्युट मारून घेण्यात आला होता. या प्रकाराची राज्यात जोरदार चर्चा सुरू असून अनिल पाटलांचा हा पहिलाच दौरा वादग्रस्त ठरल्याने अखेर अनिल पाटील यांना हा खुलासा करावा लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शुक्रवारी जळगावला त्यांचे आगमन झाले. जळगावला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केल्यावर ते अमळनेरला रवाना झाले सकाळी नऊच्या सुमारास ते अमळनेरला दाखल होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी टाकरखेडा रोडवरील भाजपाचे माजी आमदार डॉ बी. एस. पाटील यांच्या एस. एस. पाटील आश्रमशाळेच्या ३०० विदयार्थी – विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दुतर्फा बसवण्यात आले आणि अनिल पाटील यांच्या गाडयांचा ताफा जात असताना या मुलांनी उभे राहून त्यांना कडक सॅल्युट मारला. यावेळी या शाळेच्या शिक्षकांची देखील उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले. डॉ बी एस पाटील यांनी अनिल पाटील हे आपले शिष्य असून ते प्रथम येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी विदयार्थी आश्रमशाळेबाहेर उभे केल्याचे सांगितले. या प्रकाराची राज्यभर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर अखेर अनिल पाटील यांनी खुलासा केला. मात्र शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी हा सर्व प्रकार बालीशपणाचा असून मुलांना तेथे पाणीदेखील प्यायला नव्हते. तासनतास असे मुलांना वेठीस धरणे गैर आहे, असे सांगत या प्रकाराचा निषेध करत शिक्षण विभागाने याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली.
दरम्यान, अनिल पाटील यांच्या जळगाव स्वागतासाठी शरद पवार गटाचे काही पदाधिकारी नेते जळगावला उपस्थित होते. त्यांच्या नावांची यादी आपण मुंबईला पाठवली असून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी रविवारी बोलताना सांगितले.








