वनविभाग-पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : मुडलगी तालुक्यातील शिवापूर येथे काही जणांच्या नजरेला बिबट्या आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. याचबरोबर भीतीचे वातावरण पसरले असून शेताकडे जाणेही जिकिरीचे बनले आहे. याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. त्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. वनविभागाने बिबट्याच्या पायाच्या ठशांचे मोजमापही घेतले आहे. त्यांनीही बिबट्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहनदेखील केले आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी काही जणांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी ही माहिती गावात दिली. गावातील काही जणांनी वनविभागाला याची माहिती दिली.









