कट ठरला विफल : ऑटोरिक्षातील स्फोटाची जबाबदारी इस्लामिक रेसिस्टन्स कौन्सिलने स्वीकारली
तपासणी…
- कद्री मंदिर परिसरात बॉम्बशोध पथक, बॉम्ब निकामी पथकांकडून तपासणी
- कुद्रोळी, मंगळादेवी मंदिर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, संघ निकेतनचे कार्यालय टार्गेटवर
प्रतिनिधी /बेंगळूर
मंगळूरमधील ऑटोरिक्षात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाला गती देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी मंगळूरमधील कद्री मंदिरासह सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचला होता, अशी धक्कादायक बाब तपासातून पुढे आली आहे. एका संघटनेने ऑटोरिक्षातील बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
स्फोटाची जबाबदारी इस्लामिक रेसिस्टन्स कौन्सिल या संघटनेने स्वीकारल्याचे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून गुरुवारी कद्री मंदिर परिसरात बॉम्बशोध पथक आणि बॉम्ब निकामी पथकांनी तपासणी केली. कद्री येथील मंजुनाथ देवस्थान दहाव्या शतकात निर्माण झालेले ऐतिहासिक प्रसिद्ध मंदिर आहे. कुद्रोळी, मंगळादेवी मंदिर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, संघ निकेतनचे कार्यालय ही ठिकाणे देखील टार्गेटवर होती. त्यामुळे या ठिकाणीही तपासणी करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे कायदा-सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी पोस्टरविषयी सत्यासत्यता पडताळण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
ऑटोरिक्षात स्फोट झाल्याने कट विफल
गुरुवारी डार्कवेबद्वारे पोस्टर जारी करण्यात आले असून त्यात मंगळूरमधील स्फोटाची जबाबदारी ‘इस्लामिक रेसिस्टन्स कौन्सिल’ या संघटनेने घेतली आहे. या संघटनेने मुख्य संशयित आरोपी मोहम्मद शरीक याच्या मदतीने कद्री मंदिरात स्फोट घडविण्याची योजना आखली होती. तत्पूर्वीच कुकरमधील बॉम्बचा ऑटोरिक्षात स्फोट झाल्याने घातपाताचा कट विफल ठरला होता.
एडीजीपींना धमकी
बुधवार दि. 23 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या पोस्टरसह मोहम्मद शरीकचे दोन फोटो देखील अपलोड करण्यात आले आहेत. शिवाय एडीजीपी अलोककुमार यांना धमकी देण्यात आली असून तुमचा आनंद अल्पकालीन असेल. तुमच्या दबावतंत्राचा परिणाम तुम्ही अनुभवत आहात, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.
बेस मुव्हमेंट संघटनेचाही हात?
या बॉम्बस्फोटामागे तामिळनाडूतील बेस मुव्हमेंट संघटनेचाही हात असल्याचा दाट संशय आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील वरिष्ठ पोलीस अधिकारीही मंगळूरमध्ये ठाण मांडून आहेत. 1994 च्या कोईमत्तूर बॉम्बस्फोटामागे बेस मुव्हमेंट या संघटनेचा हात होता. या संघटनेवर अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रभाव आहे. मंगळूरमध्ये स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या बॉम्बचा बेस मुव्हमेंट संघटनेने वापरलेल्या बॉम्बशी साधर्म्य आहे. शिवाय संशयित शरीक त्या संघटनेच्या संपर्कात होता. त्यामुळे तपासाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.
पोलिसांची विविध पथके परराज्यात चौकशीसाठी रवाना झाली आहेत. स्फोटावेळी जखमी झालेल्या संशयित आरोपी शरीकच्या अधिक चौकशीनंतर त्याने रचलेले कट, त्याचे दहशतवादी संघटनांशी असणारे कनेक्शन, कटामागील कारणे, याविषयी उलगडा होणार आहे.
उजिरेजवळ सॅटेलाईट फोनची ‘रिंग’
राज्याच्या किनारपट्टी भागात बंदी असणाऱया सॅटेलाईट फोनचा वापर होत असल्याच्या घटना अधूनमधून घडत आहे. मंगळूरमध्ये ऑटोरिक्षात झालेल्या स्फोटाच्या आदल्या दिवशी बेळतंगडी तालुक्यातील उजिरेजवळील दाट जंगलात सॅटेलाईट फोनची रिंग झाल्याचे आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विदेशातून दहशतवाद्यांनी शरीक आणि स्लिपर सेलशी संपर्क साधला होता का? याविषयी देखील तपास केला जात आहे.
प्रकरण एनआयएकडे हस्तांतर…
मंगळूरमधील बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास राज्य सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) हस्तांतर केला आहे. गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी गुरुवारी याविषयी माहिती दिली आहे. संशयित दहशतवादी शरीकविरुद्ध युएपीए कायद्यांतर्गत तपास करण्याची एनआयएकडे सोपविण्याबाबत राज्य सरकारने शिफारस केली आहे. या प्रकरणानंतर दुसऱयाच दिवशी एनआयएने घटनास्थळी भेट देऊन माहिती जमा केली होती. मंगळूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालविला आहे. आता या प्रकरणाचा तपास अधिकृतरित्या एनआयएकडे सोपविण्यात आला आहे.









