गोध्रा येथील घटनेनंतर दुष्प्रचाराचा विरोधकांचा अजेंडा : राज्याला पुन्हा उभे केले
► वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी अहमदाबाद सायन्स सिटीत आयोजित वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेच्या 20 व्या आयोजनात सामील झाले. मोदींनी स्वत:च्या संबोधनात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना उभ्या ठाकलेल्या आव्हानांबद्दल भूमिका मांडली. 2001 पूर्वी गुजरातमध्ये पडलेला दुष्काळ, मग भूकंप आणि गोध्रा येथे रेल्वेत घडलेली घटना तसेच राज्यात फैलावलेल्या हिंसेनंतरच्या स्थितीवर मोदींनी चर्चा केली. त्यावेळी काही लोक ठराविक अजेंड्याच्या अंतर्गत गुजरातला जगात बदनाम करण्याचा कट रचत होते असा आरोप मोदींनी केला आहे.
मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि राज्य प्रतिकूल स्थितींना सामोरे जात होते, तेव्हा केंद्र सरकारमधील लोक बोलाविल्यावरही येत नव्हते. मुख्यमंत्री म्हणून मी तेव्हा फार अनुभवी नव्हतो, परंतु माजा गुजरात आणि गुजरातच्या लोकांवर अतूट विश्वास होता. मुख्यमंत्री असताना संकल्प घेत या आव्हानांमधून राज्याला बाहेर काढल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
वायब्रंट गुजरात ब्रँडिंग नव्हे बॉन्डिंग
20 वर्षांपूर्वी आम्ही एक बिज पेरले हेते, आता ते विशाल वटवृक्षात बदलले आहे. वायब्रंट गुजरात केवळ ब्रँडिंगपुरती आयोजन नसून याहून अधिक बॉन्डिंगचे आयोजन आहे. हा बॉन्ड माझ्या आणि गुजरातच्या 7 कोटी नागरिकांशी आणि त्यांच्या सामर्थ्याशी जोडलेला आहे असे मोदींनी म्हटले आहे.
दुष्काळ, भूकंप, गोध्रा, हिंसा
2001 मध्ये झालेल्या भीषण भूकंपापूर्वी देखील गुजरात दीर्घकाळापर्यंत दुष्काळाच्या स्थितीला सामोरा गेला होता. तर भूकंपामुळे लाखो लोक प्रभावित झाले. याचदरम्यान गोध्रा येथे हृदयविदारक घटना घडली आणि त्यानंतर गुजरात हिंसेच्या आगीत होरपळले. अशा प्रसंगी अजेंडा राबविणारे लोक स्वत:च्या पद्धतीने घटनांचे आकलन करत होते. गुजरातमधून युवा, व्यापारी, उद्योग सर्व पलायन करतील असे म्हटले जात होते. जगात गुजरातच्या बदनामीचा कट रचण्यात आला. गुजरात कधीच पुन्हा स्वत:च्या पायांवर उभा राहू शकणार नसल्याचे बोलले गेले. परंतु गुजरातच्या लोकांवर माझा अतूट विश्वास होता असे मोदींनी म्हटले आहे.
प्रथम थट्टा करतील, मग स्वीकारतील
आज मला स्वामी विवेकानंद यांचे वाक्य आठवत आहे. प्रत्येक कामाला तीन टप्प्यांमधून जावे लागते, प्रथम लोक त्याची चेष्टा करतात, मग विरोध करतात आणि नंतर ते स्वीकारतात. गुजरातवर ओढवलेल्या संकटावेळी मी पहिल्यांदाच आमदार झालो होतो. सरकार चालविण्याचा अनुभव नव्हता. त्या संकटात कुठल्याही स्थितीत गुजरातला यातून बाहेर काढण्याचा संकल्प घेतला होता. त्या वेळी आम्ही गुजरातच्या पुनउ&भारणीचा नव्हे तर त्यापुढील विचार करत होतो. आम्ही गुजरातच्या क्षमतेला जगासमोर प्रदर्शित करण्याचा संकल्प घेतला आणि जगाला आमचे सामर्थ्य दाखवून दिले. वायब्रेंट समिटच्या 20 वर्षांचे यश आता जग पाहत आहे. त्यावेळी केंद्र सरकार चालविणारे लोक गुजरातमधील या परिषदेत अडथळे निर्माण करत होते. केंद्रीय मंत्री परिषदेत सामील होणार असल्याचे कळवित होते, परंतु दुसऱ्याच दिवशी आपण येणार नसल्याचे सांगायचे. कदाचित या मंत्र्यांना तत्कालीन सरकार चालविणारे लोक दटावत असावेत. विदेशी गुंतवणुकदारांना गुजरातमध्ये न जाण्याची धमकी दिली जात होती. या धमक्यांना भीक न घालता गुंतवणुकदार गुजरातमध्ये आल्याचे मोदींनी म्हटले आहे.









