पद्मश्री विनायक खेडेकर, कमलाकर म्हाळशी यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
काणकोण तालुक्यातील तालगडी, तोणयाखेळ व महिलांच्या धिल्लोतील बरेच खेळ इतरत्र कुठेही नसून प्रादेशिक संस्कृती दर्शक व आकर्षक आहेत. ही गोव्यातील लोककला क्षेत्राची श्रीमंती असल्याने त्याचे जतन, संवर्धन गरजेचे आहे. काणकोणातील प्रसिद्ध लोकोत्सवात यंदा या प्रकारांचा स्वतंत्र महोत्सव व्हावा, अशी आग्रही मागणी पदमश्री विनायक खेडेकर व कमलाकर म्हाळशी यांनी केली आहे.
लोककलांचे जाणकार पद्मश्री विनायक खेडेकर, लोकवेदाचे अभ्यासक कमलाकर म्हाळशी यांनी कोणकोणात जाऊन सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. तरुणाईला असलेले दांडियाचे आकर्षण, वाढते सांस्कृतिक आक्रमण तथा बदलती जीवनशैली यामुळे तालगडी व तोणया खेळ या दोन्ही लोककला प्रकारांच्या मूलरुपात बदल होत आहेत हे प्रदूषण थांबविण्यासाठी तात्काळ उपाय योजायला हवेत. महोत्सवासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न हवेत, यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे वचन खेडेकर व म्हाळशी यांनी दिले.
कोमरपंत, नाईक भंडारी, गोमंतक मराठा यातील प्रत्येक समाजाच्या तालगडीत खास वैशिष्टय़े आहेत ती जपायला हवीत. यासाठी आगामी लोकोत्सवाआधी वरील तिन्ही प्रकारासाठी खास महोत्सव घेण्यात येऊन त्यातील गुणवत्ताधारक पथकांचे अंतिम लोकोत्सवात आविष्करण व्हावे. यातील कोमरपंत समाजाची तालगडी दिल्लीतील राजपथाचे आकर्षण होते आणि आमोण्याच्या तोणयो पथकाने रशियातील भारत महोत्सव गाजविला होता, याची आठवण खेडेकरांनी सांगितली.
सभापती रमेश तवडकर यांनी या खेडेकर व म्हाळशी यांचे म्हणणे ऐकून घेऊन आपल्यालाही ही कल्पना आवडल्याचे ते म्हणाले. दोघानीही सूचविलेल्या अशा महोत्सवाला आपली पूर्ण सहमती तवडकर यांनी दर्शविली.









