मुसळधार पावसामुळे अनेक भागातील संपर्क रस्ते बंद होण्याच्या मार्गावर : रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी : अनेक पिके पाण्याखाली
वार्ताहर/किणये
तालुक्यात मंगळवारी पावसाने अक्षरश: कहर केला. पहाटेपासून मुसळधार सुरू असलेला पाऊस रात्रीपर्यंत सुरूच होता. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक भागातील मुख्य रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागातील रस्ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत. रविवारपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. रविवारपासूनच पावसाने जोर घेतला होता. सोमवारी दिवसभरही पाऊस झाला. मात्र या तुलनेत मंगळवारी सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शेतशिवारांमध्ये पाणी साचून पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे भात, भुईमूग, बटाटा, सोयाबीन व भाजीपाला पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. मंगळवारी पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला. दिवसभर मुसळधार पाऊस सुरूच होता. यामुळे अनेकांना घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले होते.
अतिवृष्टीमुळे शिवारातील खरीप हंगामातील सर्वच कामे सध्या ठप्प झाली आहेत. मंगळवारी पावसामुळे बेळगाव-पणजी महामार्गावरील उद्यमबाग येथील मुख्य रस्त्यावर पाणी आल्यामुळे रस्त्यावर तलावाचे स्वरूप आले होते. या रस्त्यावर होणारी मुख्य वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाणी आले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांना या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती. तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस झाला. राकसकोप परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे राकसकोप, येळेबैल व सोनाली गावातील रस्त्यावरून नदीच वाहते की काय असे चित्र पहावयास मिळाले. राकसकोप परिसरात गटारींची योग्यरित्या साफसफाई केली नाही. यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे, अशी माहिती काही स्थानिक नागरिकांनी दिली.
पावसामुळे पिरनवाडी येथील पाटील गल्ली, मारुती गल्ली, कालिका गल्ली, सिद्धेश्वर गल्लीमधील काही नागरिकांच्या घरात थेट पाणी शिरले. पाटील गल्लीतील दुकानांतही पाणी शिरून साहित्याचे नुकसान झाले आहे. मच्छे गावातील लोहार गल्ली, लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, आनंद गल्ली गणपत गल्ली, गंगा गल्ली, महादेव गल्लीतील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. यामुळे घरातील सदस्यांची व महिलावर्गांची तारांबळ उडाली. घरातील साहित्याचेही नुकसान झाले आहे. यामुळे अनेक कुटुंबांना मंगळवारची रात्र काढायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला होता. गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रात्रीपर्यंत तरी पाण्याचे प्रमाण कमी झाले नव्हते. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील संपर्क रस्ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी अडचणीत
तालुक्याच्या पश्चिम भागात व अन्य भागांमध्ये बटाटा लागवड करण्यात आली आहे. बटाटा पीक उगवून आले होते. मात्र मंगळवारी झालेल्या या पावसाचा फटका बटाटा पिकाला बसला आहे. तालुक्याच्या हलगा, बस्तवाड, देसूर, नंदीहळ्ळी, राजहंसगड या भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेण्यात आलेले आहे. मात्र या पावसामुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे आडवे झाले आहे. त्यामुळे सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.









