गेल्या वर्षी सात महिन्यांनी मिळाले पैसे
फोंडा : गेल्या मार्च महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय शासकीय शिमगोत्सवात चित्ररथ देखावे, रोमटामेळ व लोकनृत्य सादर केलेल्या कलापथकांना अद्याप त्यांच्या बक्षिसांची रक्कम मिळालेली नाही. पर्यटन खाते व विविध तालुक्यातील स्थानिक शिमगोत्सव मंडळांच्या सहकार्याने गेल्या 8 ते 21 मार्च दरम्यान हा शिमगोत्सव राज्यभर साजरा करण्यात आला होता. शिमगोत्सव होऊन दोन महिने उलटले तरी ही कलापथके आपल्या बक्षिसांच्या रक्कमेच्या प्रतिक्षेत आहेत.
यंदा राज्यभरात सतरा ठिकाणी शिमगोत्सव मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 20 ते 25 छोटेमोठे स्वयंचलित चित्ररथ देखावे, 13 रोमटामेळ पथके, तसेच लोकनृत्य पथके व वेशभूषा कलाकारांनी सहभाग दर्शविला होता. या सर्व पथकांना त्यांच्या पारितोषिकांची रक्कम अद्याप मिळालेली नाही. पैसे वेळेत मिळावे, यासाठी पथकातील कलाकार पर्यटन खाते व स्थानिक आयोजकांशी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. एखादा मोठा चित्ररथ उभारण्यासाठी व त्याचे सादरीकरण करण्यासाठी पाच ते सहा लाख ऊपये खर्च येतो. त्यात देखावा तयार करण्यासाठी लागणारा खर्च, प्रत्येक मिरवणुकीसाठी जनरेटर, डीजे ध्वनीयंत्रणा, कलाकारांच्या जेवणाखाण्याचा खर्च आदीचा समावेश असतो. रोमटामेळ पथकालाही दर दिवशी वाहनाचे भाडे, साहित्य खरेदीसाठीचा खर्च तसेच दिडशे ते दोनशे कलाकारांचा जेवणाखाणाचा खर्च दरदिवशी करावा लागतो. हा हिशेब केल्यास दोन ते तीन लाख खर्च येतो. लोकनृत्य पथके व वेशभूषा कलाकारांनाही असाच कमी अधिक खर्च असतो. बक्षिसांची रक्कम वेळेत मिळाल्यास त्यांना खर्चातील देणी लवकर चुकती करता येतात.
गेल्या वर्षी राज्यभरात पाच ठिकाणी राज्यस्तरीय शिमगोत्सव मिरवणूक झाली होती. त्यावेळी बक्षिसांची रक्कम या कलापथकांना सात महिन्यांनी मिळाली होती. बहुतेक चित्ररथ, रोमटामेळ व अन्य पथके सर्व तालुक्यांमध्ये शिमगोत्सव झाल्यानंतर एकत्र खर्च सादर करतात. स्थानिक आयोजन समिती त्यांना बक्षिसाच्या रक्कमेची पावती देते. या पावतीसह संबंधीत पथक प्रमुखाचे आधारकार्ड व बँक खात्याचा तपशील पर्यटन खात्याला द्यावा लागतो. काही स्थानिक शिमगोत्सव आयोजन समित्यांनी अद्याप त्यांच्याकडील तपशील पर्यटन खात्याकडे पाठविलेला नाही, असे काही पथकप्रमुखांनी सांगितले.
अतिरिक्त बक्षिसांची रक्कमही रखडली
बऱ्याच तालुक्यांमध्ये पर्यटन खात्याकडून जाहीर केलेल्या बक्षिसांच्या नियोजित रक्कमेपेक्षा स्थानिक आयोजक वाढीव रक्कमेची बक्षिसे ठेवतात. नियोजित रक्कमेवरील अतिरिक्त रक्कम स्थानिक आयोजक संबंधीत पथकांना त्याच ठिकाणी चुकती करतात. यंदा पणजी, कळंगुट, वाळपई, साखळी, डिचोली याठिकाणी झालेल्या स्पर्धांतील बक्षिसांची अतिरिक्त रक्कम या कलापथकांनी वेळेत मिळाली आहे. मडगाव व पर्वरी येथील अतिरिक्त रक्कम अद्याप चुकती करण्यात आलेली नाही, असेही काही कला पथकप्रमुखांनी सांगितले.









