पुणे / प्रतिनिधी :
खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत पक्षामध्ये कोणतीही चर्चा वा विचार विनिमय झालेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी येथे स्पष्ट केले. पाटील यांनी रविवारी बापट यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली.
गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर लढण्यास काँग्रेस उत्सुक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले होते. त्यांच्या निधनाला तीन दिवस झाले असून, इतक्यात गुढघ्याला बाशिंग बांधण्याची घाई का, काही माणुसकी वगैरे आहे की नाही, असा सवाल करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगा’, अशा कानपिचक्या त्यांना दिल्या होत्या. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही पोटणीवडणुकीविषयी आपली भूमिका मांडली.
पाटील म्हणाले, बापट साहेबांचे नुकतेच निधन झाले आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात आम्ही अद्याप कोणताही विचार केलेला नाही. आम्हाला बापटसाहेबांबद्दल आदर आहे. आमचे नेते शरद पवार यांनीदेखील त्यादिवशी सर्व कार्यक्रम रद्द केले होते आणि ते गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. आम्ही अजून पुणे लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केलेली नाही. तसेच याबाबत अजून तरी कसलाच विचार वा भूमिका ठरलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.