निवडणुकीमुळे पाणीसमस्येकडे दुर्लक्ष : ता. पं.मध्ये पाण्यासंदर्भात बैठक नाही, निवडणुकीच्या कामाचे कारण : अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याबरोबरच तालुक्यातही पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. याआधीच बेळगाव तालुक्यातील काही गावांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासाठी येत्या काळात पाण्याची समस्या उद्भवू नये म्हणून तालुका पंचायतमध्ये तातडीची बैठक घेण्याची गरज आहे. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्याचे सांगून ते सध्या फिरतीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाणी समस्या कशी सोडवता येईल, याकडे नुकत्याच जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोवर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. मात्र तालुका पंचायतमध्ये याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी येत्या काळात ही समस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, तालुका पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पिडीओ व पाणी पुरवठा विभागाशी संलग्न असणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना करणे गरजेचे आहे.
नादुरुस्त कूपनलिकांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज
बेळगाव तालुक्यात जुन्या कूपनलिका, विहिरींची डागडुजी करून त्यातील पाणी वापरात आणावे, तसेच ज्या गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. दरम्यान, याबाबत आतापासून प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून सध्या निवडणुकीच्या कामात अनेक अधिकारी गुंतले असले तरी नागरिकांच्या पाणी समस्येचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या सुरू असलेल्या पाणी समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टिने सर्वत्रच बैठका घेण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. ज्या गावांत नादुऊस्त कूपनलिका आहेत त्यांची तातडीने दुऊस्ती करून ती नागरिकांच्या उपयोगात आणावी. सध्या पाण्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्या निवारण्यासाठी आतापासून कामाला लागणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
ट ँकरने पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा
प्रत्येक ग्राम पंचायतीत पाणी समस्यांबाबत कोणीही आल्यास त्यांच्या समस्या ऐकूण घेऊन त्या कशा निवारता येतील, याची काळजी घेतल्यास काहीअंशी ही समस्या कमी होणार आहे. तसेच ज्या गावात खरंच पाणीसमस्या गंभीर होत आहे. अशा गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज आहे. सध्या ही समस्या सोडविण्यासाठी एका कमिटीची स्थापनाही करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज असून तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिल्यास सोयीचे ठरणार आहे. मात्र तसे होताना दिसत नाहीत. अधिकारी ना कार्यालयात ना दौऱ्यावर, त्यातच निवडणुकीची कारणे सांगत मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. जर आणखी काही दिवस असेच सुरू राहिल्यास येत्या काळात पाणी समस्या गंभीर रूप धारण करणार यात शंका नाही.









