सभापती रमेश तवडकर यांचे स्पष्टीकरण
मडगाव : काँग्रेसच्या आठ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीच्या दरम्यान सर्वांना पुरेशी वेळ दिली जात आहे. या याचिकेवरील निवाडा ठराविक कालावधीत द्यावा, असे आपल्यावर कोणतेच बंधन नाही, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी काल सोमवारी मडगावात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. सभापती म्हणून आपणाला न्यायाधीशाच्या भूमिकेतून दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. सुनावणीला सुऊवात होऊनच वर्षभराचा कालावधी झालेला आहे. या दरम्यान, विधानसभा अधिवेशने झाली आहेत. त्यामुळे अपात्रता याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडते. तसेच सभापती म्हणून आपणास ठराविक कालावधीत निर्णय दिला पाहिजे, असे वेळेचे कोणतेही बंधन नाही, असेही तवडकर यांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजूंनी विविध प्रकारचे प्रस्ताव येत असतात. काहीवेळा पुढील सुनावणीसाठी वेळ मागून घेतली जाते. कधीकधी सुनावणीचे कामकाज दहा मिनिटेही चालते. कधीकधी चर्चा, युक्तिवाद लांबल्यास दीड तासही लागतो. उलटतपासणी व इतरही विषय असतात. त्यामुळे सभापती म्हणून न्याय देताना घाई करून चालत नाही, असे तवडकर यांनी सांगितले.
आठ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सभापती काहीही करत नाहीत असा आरोप केला जातो तसेच वृत्तपत्रातून बातम्या येत असतात. मात्र, त्यात काहीच तथ्य नाही. आपण अपात्रता याचिकेवर सुनावणी घेत असल्याचे सभापतीनी स्पष्ट केले. सभापती म्हणून पदाचा ताबा स्वीकारल्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीत विधानसभेचे कामकाज सांभाळून याप्रकरणी सुनावणी घेतलेली आहे. अपात्रता याचिकेवर सुनावणी घेतलीच नाही, असे काही नाही. न्यायालयात अनेक याचिकांवरील सुनावणी पाच ते दहा वर्षांपर्यंत चालते आणि त्यानंतर निवाडा येत असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसे या याचिकेच्या सुनावणीविषयी झालेले नाही. सुनावणी सुरू होऊन वर्षभराचा कालावधी झालेला आहे, असे तवडकर म्हणाले.









