सरसंघचालक भागवतांचे प्रतिपादन ः आपणच श्रेष्ठ असल्याची धारणा त्यागावी लागणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आमची ओळख, राष्ट्रीयत्व आणि सर्वांना आपले मानून आणि सोबत घेत चालण्याची प्रवृत्ती असल्याचे म्हटले आहे. इस्लामला देशात कुठलाच धोका नाही, परंतु याकरता आम्हीच श्रेष्ठ आहोत ही धारणा सोडून द्यावी लागणार असल्याचे भागवत यांनी ‘ऑर्गनायजर’ आणि ‘पांचजन्य’ला दिलेल्या मुलाखतीत नमूद पेले आहे.
भागवत यांनी या मुलाखतीत एलजीबीटी समुदायाचेही समर्थन केले. एलजीबीटी समुदायाच्या खासगीत्वाचा आदर केला जावा. अशाप्रकारचा ओढा असणारे लोक नेहमीपासून होते, मानवाचे अस्तित्व असल्यापासून जीवनाची ही एक पद्धत आहे. या समुदायाला खासगीत्वाचा अधिकार मिळावा आणि आपण या समाजाचा भाग आहोत अशी जाणीव त्यांच्यात निर्माण व्हावी अशी आमची इच्छा असल्याचे सरसंघचालकांनी मुलाखतीत म्हटले आहे.
तृतीयपंथी लोक (ट्रान्सजेंडर) समस्या नाहीत, त्यांचा स्वतःचा पंथ आहे, त्यांचे स्वतःचे देवीदेवता आहेत, आता तर त्यांचे महामंडलेश्वर आहेत. संघाचा कुठलाच वेगळा दृष्टीकोन नसून हिंदू परंपरेने सर्व गोष्टींवर विचार केला आहे. हिंदू ही आमची ओळख, राष्ट्रीयत्व आणि सर्वांना आपले मानत सोबत घेऊन वाटचाल करण्याची वृत्ती आहे. हिंदुस्थान, हिंदुस्थान म्हणून कायम रहावा अशी साधीसरळ गोष्ट आहे. यामुळे सध्या भारतात असलेल्या मुस्लिमांना कुठलेच नुकसान नसल्याचे भागवत यांनी नमूद केले आहे.
हिंदू समुदायाला 1 हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून युद्ध करावे लागले आहे. या समुदायाला विदेशी आक्रमक, विदेशी प्रभाव आणि विदेशी षडयंत्रांच्या विरोधात लढावे लागले आहे. इस्लामला भारतात कुठलाच धोका नाही, परंतु आम्ही श्रेष्ठ आहोत, एकेकाळी या देशावर आम्ही राज्य केले ही धारणा सोडावी लागेल. मुस्लिमांना पूर्वजांच्या रुढी पुन्हा स्वीकारायच्या असतील, तर ते स्वीकारू शकतात, हा पूर्णपणे त्यांचा निर्णय असणार आहे. मात्र त्याचवेळी मुस्लिमांनी आपणच सर्वोत्तम असल्याची धारणा सोडून द्यावी लागणार असल्याचे सरसंघचालक म्हणाले.
लोकसंख्या धोरणासाठी विचार व्हावा
देशात हिंदू आज बहुसंख्य आहेत हे प्रथम हिंदूंना समजण्याची गरज आहे. लोकसंख्या एक भार देखील आहे आणि एक उपयुक्त बाब देखील आहे, अशा स्थितीत पूर्वीच सांगितल्याप्रमाणे दूरगामी आणि सखोल विचारपूर्वक एक धोरण तयार करणे गरजेचे असल्याचे भागवत यांनी लोकसंख्येविषयी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे. तसेच लोकसंख्या धोरण सर्वांवर समान स्वरुपात लागू होण्याची गरज आहे, परंतु याकरता बळजबरी केली जाऊ नये. लोकसंख्या धोरणाकरता सर्वांना जागरुक करावे लागणार आहे.
पाकिस्तानची निर्मिती का झाली?
लोकसंख्येतील असंतुलन अव्यवहार्य बाब आहे, कारण जेथे असंतुलन निर्माण झाले, तेथे देशात फूट पडल्याचे जगभरात दिसून आले आहे. एकमात्र हिंदू समुदाय असा आहे जो आक्रमक नाही, याचमुळे अनाक्रमकता, अहिंसा, लोकशाही, धर्मनिरपेक्षता सर्वकाही टिकवायचे आहे. तिमोर, सूडानचे उदाहरण आम्ही पाहिले, पाकिस्तानची निर्मिती आम्ही पाहिली आहे. राजकारण सोडून तटस्थपणे पाकिस्तानची निर्मिती का झाली याचा विचार केला जावा असे ते म्हणाले.
स्वातंत्र्य अबाधित राहणार
इतिहासात भारत अखंड होता. मग इस्लामिक राजवटींचे आक्रमण, इंग्रजांनी काढता पाय घेतल्यावर देशाची फाळणी कशी झाली हे सर्वांना माहित आहे, हे आम्हा सर्वांना आम्ही हिंदू भाव विसरल्याने भोगावे लागले आहे. आमच्या राजनयिक स्वातंत्र्याला छेडण्याची शक्ती आता कुणातच नाही. या देशात हिंदू राहणार, हिंदू जाणार नाही हे आता निश्चित झाले आहे. हिंदू आता जागृत झाला आहे. याचा वापर करत आम्हाला अंतर्गत लढाईत विजय मिळवत आमच्याकडे तोडगा सादर करावा लागणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
राजकारणापासून दूर
नवनवी तंत्रज्ञाने येत आणि जात राहतील. परंतु तंत्रज्ञान मानवासाठी आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेवरून लोकांना भीती वाटू लागली आहे, असेच सुरू राहिल्यास भविष्यात यंत्रांचे राज्य येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाणूनबुजून स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले आहे, परंतु आमची राष्ट्रीय धोरणे, राष्ट्रीय हित आणि हिंदू हिताला प्रभावित करणाऱया घडामोडींशी संघ नेहमीच जोडलेला राहिला असल्याचे सरसंघचालकांनी म्हटले आहे.









