पुणे / प्रतिनिधी :
अजितदादा पवार हे आमच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. पक्षाच्या विरोधात त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली आहे आणि त्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे. तथापि, राष्ट्रवादी काँगेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेत बारामती मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. अजित पवार यांच्या बंडानंतर अजितदादा गटाने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे छायाचित्र वापरू नये, अशी सूचना दस्तुरखुद्द पवार यांनीच केली होती. त्यानंतरही अजित पवार गटाकडून त्यांचे फोटो वापरले जात होते. मात्र, आता पवार यांचे फोटो वापरणे बंद करण्यात आले आहे. त्यावरून राष्ट्रवादीत आता खऱ्या अर्थाने उभी फूट पडली असल्याकडे लक्ष वेधले जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे अध्यक्ष हे जयंत पाटील आहेत. तर अजितदादा हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही तक्रारही दिली आहे. आता त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघत आहोत. आमच्या पक्षाची भाजपाबरोबर कुठलीही युती नाही आणि आघाडीदेखील नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुणी कोणत्या पदावर काय नियुक्त्या केल्या, हे आम्हाला माहीत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलत आहोत. कोणताही कार्यकर्ता तसेच नेता संभ्रमात नाही. शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. पक्षाची स्थापना झाल्यापासून पवार यांनी एकदाही विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. त्यांनी देशातील राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. ‘इंडिया’ आघाडीतील सगळी मंडळी शरद पवारांना नेता मानतात. राज्यात व राज्याबाहेरही त्यांच्याच नेतृत्वाखाली आमदार निवडून येतात. अनेकवेळा आमचा पक्ष राज्यात क्रमांक एकला होता आणि मला आठवते, की पक्षाने आतापर्यंत फक्त 114 जागा लढवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. काही वेळेला तो अयशस्वी झाला, तर काही वेळेस यशस्वीदेखील झाला. भाजपसाठी साम, दाम, दंड, भेद वापरून सत्तेत येणे, हे अधिक महत्त्वाचे आहे. सरकारचा कारभार कशा पद्धतीने सुरू आहे, हे गेल्या दीड वर्षांत आपण सर्व पाहतच आहोत, अशी टीकाही त्यांनी केली.
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भुजबळ बोलतात ती टीका नाही, तर त्या त्यांच्या भावना आहेत. एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत, हे मला माहीत आहे. दुसरे कोणत्या पक्षाचे आहेत, हे मला माहीत नाही, असे सांगत जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने लवकरात लवकर महापालिकेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
फडणवीसांवर भाजपकडून अन्याय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे 105 आमदार निवडून आणले आहेत. पण, ते मुख्यमंत्री झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर भाजपने अन्याय केला आहे, असे वाटते. यावर मी काही बोलणार नाही, असेही सुळे यांनी या वेळी सांगितले.