बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात धावताहेत कालमर्यादा संपलेली अनेक वाहने, कारवाईकडे पाठ, पर्यावरणाला मोठा धोका, 20 ते 25 वर्षांपूर्वीची वाहने धावतात रस्त्यावर, नूतनीकरण करून घेण्याकडेही दुर्लक्ष

दीपक बुवा /बेळगाव
सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यातच धन्यता मानली जाते. परिणामी अनेकवेळा ते कायद्याच्या चौकटीत अडकतात. मात्र त्याचा विचार न करता अनेकजण आपला मनमानी कारभार सुरूच ठेवतात. दरम्यान सरकारी नियमांनुसार वाहन खरेदीनंतर त्याची कालमर्यादा 15 वर्षे असते. मात्र बेळगाव शहरात आता 20 ते 25 वर्षे उलटली तरी ती वाहने रस्त्यावर फिरू लागली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे आता लक्ष वेधणे गरजेचे असून अशा वाहनांमुळे पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.
प्रत्येक वाहनाला कालमर्यादा असते. ठरावीक कालमर्यादेनंतर ते चालविण्याच्या स्थितीत राहत नाही. त्यामुळेच अशी वाहने रस्त्यावर धावताना धोकादायक व जीवघेणी ठरू शकतात. ही बाब गांभीर्याने घेणे गरजेची आहे. वाहनांचे वय 15 वर्षे निर्धारित केले आहे. वाहन जुनाट झाले की त्याच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते, वाहनात अनेक दोष निर्माण होतात. त्यामुळेच ही वाहने रस्त्यावरून चालविणे म्हणजे अपघातांना निमंत्रण देण्यासारखे आहे. आरटीओने अशा वाहनांवर कडक कारवाई करणे गरजेचे ठरते. परंतु पोलीस प्रशासन आणि आरटीओंनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शहरात अशाप्रकारच्या कालमर्यादा संपलेल्या शेकडो भंगार वाहनांचा मुक्तसंचार सुरू आहे.

15 वर्षे पूर्ण झालेल्या एकाही मालकाने प्रामाणिकपणे आरटीओ कार्यालयात जाऊन आपल्या वाहनांची कालमर्यादा संपली आहे का, याची चौकशी केली नाही. परिणामी अशा प्रकारामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. मध्यंतरी आरटीओंनी अशा वाहनांना सरकारजमा करण्याचा आदेश काढला होता. मात्र त्याला प्रत्यक्षात प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा ऑनलाईन वाहनांची माहिती जमवून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कडक नियमावली गरजेची
आरटीओला भंगार वाहने सापडत नसतीलही, परंतु काही लोक मात्र प्रामाणिकपणे अशी वाहने घेऊन आरटीओ कार्यालयात तपासणीसाठी येतात. परंतु याबाबत जागरूकताच कमी आहे. त्यामुळे त्यांची संख्या खूप कमी आहे. यामुळे बेळगाव शहरात भंगार वाहनांची संख्या वाढतीच आहे. बाहेरील देशांप्रमाणे याबाबत कडक नियमावली करण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.
जर वाहन पूर्णपणे भंगारात घालण्यासारखे झाले असेल आणि चालक ते बेकायदा चालवत असेल तर त्याच्याविऊद्ध कारवाईची तरतूद आहे. आरटीओ तपासणीवेळी अशा वाहनांची नोंदणी व परमिट रद्द करते. जर वाहनाची अवस्था अतिशय खराब असेल तर आरटीओ वाहन जप्त करून स्वत: ते नष्ट करतात. मात्र आतापर्यंत असे एकही वाहन आरटीओ विभागाला सापडले नाही, हे आश्चर्य म्हणावे लागेल. परिणामी अशीच वाहनांची संख्या वाढत असेल तर याचा मोठा फटका पर्यावरणाला बसू शकतो. कारण वाहन जुने झाले की धूर अधिक प्रमाणात सोडते. त्यामुळेच हा धोका ओळखून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्रुटी आढळल्यास दुरुस्ती
कायद्यानुसार वाहनांची कालमर्यादा संपली की वाहनचालकाने आरटीओत येऊन वाहनाची स्थिती तपासणे आवश्यक आहे. मग आरटीओ आपल्या कार्यालयातील तज्ञ मेपॅनिककडे वाहन तपासणीसाठी सुपूर्द करतात. तपासणीअंतीच संबंधित वाहन रस्त्यावर चालविण्यालायक आहे की नाही, हे प्रमाणित केले जाते. जर वाहनात कुठली त्रुटी आढळली आणि ती दुऊस्त करण्यालायक असेल तर ती काढली जाते. नंतरच त्या वाहनाला रस्त्यावर चालविण्याची परवानगी दिली जाते.
भंगार वाहनांबाबत अधिकाऱ्यांनाच माहिती नसते. प्रादेशिक परिवहन अधिकारी यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळेच अशा वाहनांची संख्या अधिक आहे. दरम्यान बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात साधारणत: 4 लाखांहून अधिक वाहने आहेत. यामध्ये 15 वर्षे उलटून गेलेल्या वाहनांची संख्या साधारण 10 हजारांहून अधिक असेल. अनेकजण गेल्या 25 ते 30 वर्षांची वाहनेही चालवत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात भरच पडणार आहे.
विशेष मोहीम हाती घेणार
सरकारी नियमानुसार भंगार वाहन म्हणजे केवळ कालमर्यादा नव्हे. 15 वर्षे ही आयुमर्यादा असली तरी त्याआधीही एखादे वाहन भंगार होऊ शकते. त्यामुळे वाहनांची तपासणी करूनही काळजी घेतली जाऊ शकते. मात्र तसे करताना कोणी दिसत नाही. परिणामी यासाठी आता विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आयुमर्यादा संपली असली तरी त्या वाहनांचे नुतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. नुतनीकरण केल्यानंतर 5 वर्षे पुन्हा मुदतवाढ मिळते. मात्र तरीही अशा वाहनांवर कारवाई होणारच, असे ते म्हणाले.
– आरटीओ शिवानंद मगदूम









