स्थानिक स्वराज्य संस्थांची कोटीची थकीत वीजबिले : हेस्कॉमचा पायाच झालाय डळमळीत
बेळगाव : शहर तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाची वीजबिले थकली आहेत. संपूर्ण हेस्कॉम विभागात तब्बल 647 कोटी रुपयांची बिले अडकून पडली आहेत. यामुळे हेस्कॉमचा आर्थिक पाया डळमळीत होत असल्याने वीजबिल भरण्यासाठी सरकारी विभागाकडे हेस्कॉमकडून तगादा लावण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात 109 कोटी 37 लाख रुपयांचे थकीत बिल असल्याने ते वसूल करण्याचे मोठे आव्हान हेस्कॉम प्रशासनासमोर आहे. हेस्कॉमकडून महानगरपालिका, नगरपंचायत, ग्राम पंचायतींना पाणीपुरवठा व पथदिपांसाठी वीजपुरवठा दिला जातो. हेस्कॉम कार्यक्षेत्रात बेळगाव, धारवाड, हावेरी, उत्तर कन्नडा, गदग, बागलकोट, विजयपूर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. मागील पाच ते सहा वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांची वीजबिले थकीत आहेत. अनेकवेळा नोटिसा देऊनदेखील त्यांच्याकडून वीजबिल जमा केले जात नसल्याने काहींचा वीजपुरवठाही तोडण्यात आला आहे. यामुळे काही रात्री अंधारातही घालवाव्या लागल्या. सामान्य नागरिकांनी बिल भरण्यास दोन दिवस उशीर केला तर तिसऱ्या दिवशी त्यांचा वीजपुरवठा तोडला जातो. परंतु, सरकारी कार्यालयांच्या कोटीच्या थकबाकीकडे मात्र हेस्कॉम जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ धारवाड जिल्ह्यात 130 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. यामुळे एकीकडे कारवाईचा धडाका सुरू असताना कोटी रुपयांच्या बिलांसाठी चालढकल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंटचेही बिल थकलेलेच!
बेळगावच्या कॅन्टोन्मेंट बोर्डचे 3 कोटी 89 लाख रुपयांचे वीजबिल मागील काही वर्षांपासून थकीत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण देत थकबाकी दिवसेंदिवस फुगत आहे. मध्यंतरी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदिपांचा पुरवठा तोडण्यात आला. यामुळे 8 ते 9 दिवस संपूर्ण कॅन्टोन्मेट परिसर अंधारात होता. बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिल भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु, आजवर हे वीजबिल भरण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.
पावणे तीन कोटींची मनपाची थकबाकी
बेळगाव महानगरपालिकेच्या विविध कार्यालये, पथदीप यासाठी हेस्कॉमकडून वीजपुरवठा केला जातो. आतापर्यंत 2 कोटी 94 लाख रुपयांचे वीजबिल मनपाने थकविले आहे. मध्यंतरी गोवावेस येथील कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्सचा वीजपुरवठा हेस्कॉमने तोडला होता. त्यानंतर काही रक्कम जमा करण्यात आली खरी. परंतु, अद्यापही 3 कोटींच्या आसपास वीजबिल थकीत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे हे बिल वसूल करण्यासाठी हेस्कॉम प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
कोणाकडे किती वीजबिल थकबाकी?
- बेळगाव महानगरपालिका 2 कोटी 94 लाख
- बेळगाव कॅन्टोन्मेंट 3 कोटी 89 लाख
- हुबळी-धारवाड महानगरपालिका 47 कोटी 51 लाख
- कारवार महानगरपालिका 1 कोटी 16 लाख
- विजयपूर नगरपालिका 89 लाख
- बागलकोट नगरपालिका 86 लाख









