शाळा-महाविद्यालय परिसरात बिनदिक्कतपणे विक्री : संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
बेळगाव : शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात सिगरेट, बिडी, गुटखा यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी असल्याचा भिंतींवर लिहिलेला मजकूर फोल ठरला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील मार्केट, काकतीवेस, शिवबसवनगर, कॉलेज रोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर तसेच सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल, चिकोडी, हुक्केरी गोकाक, रायबाग, खानापूर आदी शहरांमध्ये शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची प्रकरणे दाखल झाली असून पालकवर्गातून खेद व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार 2024-25 मध्ये बेळगाव शहर व जिल्ह्याच्या विविध भागात छापे घालून 1,130 प्रकरणे दाखल करून 64 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर 2025 च्या एप्रिलपासून आतापर्यंत 9 प्रकरणे दाखल झाली आहेत. अधिकारीवर्ग केव्हातरी एकदा छापे घालून प्रकरणे दाखल करीत असतात. वरचेवर छापे घालून तपासणी केल्यास तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला आळा बसेल, असे पालकांचे मत आहे. लहानसहान दुकाने, पानटपरी, हॉटेल, किराणी दुकाने यासारख्या स्थळांवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असते. अशा स्थळांची वारंवार तपासणी करण्यात आली पाहिजे, असेही पालकांचे मत आहे.
498 प्रकरणे दाखल
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कोष, महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शहर तंबाखू नियंत्रण कोषची स्थापना करण्यात आली आहे. नियमबाह्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा अधिकार या कोषना आहे. पण या कोषकडून कोणत्याच हालचाली होत नाहीत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची बिनदिक्कतपणे विक्री होत असते. मागील वर्षी बेळगाव आणि परिसरातील शहरी भागातून एकूण 498 प्रकरणे दाखल झाली आहेत.
नियमबाह्या विक्रीला आळा बसणार?
कोप्टा कायदा 2013 अन्वये 18 वर्षांखालील तरुणांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, असा नियम आहे. मात्र या नियमाचे योग्यरितीने पालन होत नाही. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व्याप्तीमध्ये आरोग्य निरीक्षकांनी वेळोवेळी पाहणी करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केल्यास तंबाखूजन्य पदार्थ नियमबाह्य विक्रीला पायबंद बसणार आहे.









