पुणे / वार्ताहर :
पुण्यातील गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा पुणे शहरात तीन हजार 566 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख 54 हजार 686 घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा, याकरिता साडेसात हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा गणेश मंडळांनी किती ढोल ताशा पथके ठेवावीत, यावर निर्बंध असणार नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, राहुल श्रीरामे, ए.राजा उपस्थित होते. पुण्यात बंदोबस्ताकरिता बीडीडीडी पथके, क्मयूआरटीचे अधिकारी,अंमलदार तैनात करण्यात येणार असून, वाहतूक नियंत्रणाकरिता वाहतूक शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. पुणे शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरीता एकूण 1709 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
अधिक वाचा : MPSC च्या ऑप्टिंग आऊट कार्यपद्धतीत सुधारणा
मेट्रोच्या कामामुळे मिरवणुकीस बाधा
पुण्यात विविध मार्गांवर सध्या पुणे मेट्रोचे कामकाज सुरू आहे, त्यामुळे मिरवणूक काढताना काही निर्बंध येणार आहे. डेक्कन पो.स्टे. अंतर्गत छत्रपती संभाजी पूल, लकडी पल मेट्रो ओव्हर ब्रिज उंची 21 फूट, गरवारे मेट्रो स्टेशन 18 फूट, कर्वे रोडवरील ओव्हर ब्रिजच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोडची रुंदी 15 फूट व पुणे मनपा मेट्रो पूल 21 फूट असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीस अडथळा होवू शकतो. वनाज मेट्रो स्टेशन कॉन्क्चर पिलर 20 फूट, आनंदनगर मेट्रो स्टेशन कॉन्क्चर पिलर 165 फूट, पडल स्टेशन कॉन्क्चर पिलर 17 फूट उंच असल्याने विसर्जन मिरवणुकीस अडथळा होवू शकतो. गणेशोत्सव काळात पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, गणेशोत्सव शांततेत पार पडावा, याकरीता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती, पोलीस मित्र समिती यांना आयुक्त, परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त, पोलीस स्टेशन स्तरावर एकूण 69 बैठका घेण्यात आल्या असून, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या आहेत.