मुक्तता करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
1984 च्या शिखविरोधी दंगलीप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार आणि बलवान खोखर यांची शिक्षा स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शिक्षेविरोधात दोघांच्या याचिकेवर जुलैमध्ये अंतिम सुनावणी करणार आहे, तोपर्यंत सुनावणी न झाल्यास दोघेही शिक्षा स्थगित करण्याची विनंती न्यायालयाला करू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
17 डिसेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमार यांना दंगलीच्या एका प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच बलवान खोखर समवेत काही अन्य दोषींना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली होती. या सर्व दोषींना दिल्लीच्या राजनगर भागात 5 शिखांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झाली आहे.
सज्जन कुमार यांनी यापूर्वी अनेकदा जामिनासाठी सर्वेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला आहे. 2021 मध्ये सज्जन कुमार यांनी प्रकृती अस्वास्थाचे कारण देत जामिनाची मागणी केली होती. तसेच मेदांता रुग्णालयात उपचार करवून घेण्याची अनुमती मागितली होती. सज्जन कुमार हे क्रूर गुन्ह्याप्रकरणी दोषी आहेत, व्हीआयपी सुविधेची अपेक्षा त्यांनी करू नये. तुरुंग अधिकारी आणि डॉक्टरांना आवश्यक वाटले तरच ते सज्जन कुमारांना रुग्णालयात दाखल करतील असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत म्हटले होते.









