वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांचा पुत्र अब्दुल्ला आझम खान यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. 10 मे रोजी स्वार विधानसभा जागेवरील मतदान रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अब्दुल्ला यांना एका खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांनी आपल्या अपात्रतेला स्थगिती देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. सर्वोच्च न्यायालय निवडणुकीवर बंदी घालू शकत नसल्याचे भाष्य करत सुनावणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकली आहे. अब्दुल्ला आझम खान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.
खान यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यापूर्वी उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. अब्दुल्ला आझम यांना रामपूर विशेष न्यायालयाने बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर त्यांना सदस्यत्व गमवावे लागले होते. या निर्णयाविरोधात सपाचे नेते उच्च न्यायालयात गेले होते, मात्र तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर विधानसभा पोटनिवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.









