नवी दिल्ली :
दिल्ली अबकारी घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना शुक्रवारी राउज अॅव्हेन्यू न्यायालयाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. न्यायालयाने त्यांची कोठडी 4 डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. न्यायालयाने आप नेते संजय सिंह यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान त्यांना तुरुगांत इलेक्ट्रिक केटल देण्याची अनुमती दिली आहे. तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी लवकरच पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे. ईडीने 4 ऑक्टोबर रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजय सिंह यांच्या शासकीय निवासस्थानी छापे टाकत अनेक तास चौकशी केल्यावर त्यांना अटक केली होती. यानंतर 5 ऑक्टोबर रोजी संजय सिंह यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. संजय सिंह यांना न्यायालयीन कोठडीपासून अद्याप दिलासा मिळू शकलेला नाही. दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांनाही अटक झाली आहे. घोटाळ्याचा आरोप झाल्यावर केजरीवाल सरकारने अबकारी धोरण मागील वर्षी मागे घेतले होते.









