कोणासोबत मतभेद नसल्याचेही स्पष्टीकरण
बेळगाव : पक्ष वाचवणे व सरकार सुरक्षित ठेवणे हेच आपले कर्तव्य आहे. याव्यतिरिक्त आपल्यासाठी दुसरे काम नाही. इतर कोणत्याही कारणासाठी आपल्या नावाचा वापर करू नका, कोणत्याही नेत्याबरोबर आपले मतभेद नाहीत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल आहे, असे सांगितले. सोमवारी पत्रकारांशी बोलताना कार्यकर्त्यांचे संरक्षण करणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. आपले काम आपण करत आहोत. कोणी तरी खोटी गोष्ट पसरवली म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. यासाठी आपण व हायकमांड समर्थ आहोत. आपण कोणाशीही भेटलो तरी पक्षात बंडाळी आहे, असा त्याचा अर्थ काढू नका,अशी विनंतीही त्यांनी पत्रकारांना केली. काँग्रेसमध्ये बंडाळी नाही का? या प्रश्नावर कोणतीही बंडाळी नाही, आपले कोणाशीही मतभेद नाहीत,
आपण अध्यक्षपदावर आहोत, आपल्यासाठी सर्वजण समान आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे. आमदार, मंत्री आम्ही सगळे एक आहोत, असे सांगतानाच पक्षाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांच्याबद्दल काही नेत्यांनी हायकमांडकडे तक्रार केली आहे. ही बातमीच खोटी आहे. कोणीतरी खोटी माहिती पसरवत आहेत, असे सांगितले. रविवारी आपण माजी आमदार फिरोज सेठ यांच्या निवासस्थानी भेट दिली. याबद्दलही प्रसिद्धी माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. फिरोज सेठ हे ज्येष्ठ नेते आहेत. माझ्या सोबत त्यांनी काम केले आहे. बेळगावात मोठा मेळावा होत आहे. त्यामुळे आपण त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. कोणावर तरी विश्वास ठेवून प्रसिद्धी माध्यमांनी आपला विश्वास गमावू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्र्यांनी दिला. पक्षासाठी आपण त्याग केला आहे. लोकांचे भले होत असेल तर तेवढेच पुरे, असे त्यांनी सांगितले.
सुवर्ण विधानसौधला भेट देऊन तयारीची पाहणी
मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी होणाऱ्या महात्मा गांधी पुतळ्याचे अनावरण व जय बापू, जय भीम, जय संविधान मेळाव्यात भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा, एच. के. पाटील, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, जमीर अहमद यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सोमवारी बेळगावात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण विधानसौधला भेट देऊन तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.









