पुणे / प्रतिनिधी :
अजित पवार माझे मोठे बंधू असून, आम्ही परस्परांविरोधात नाही. त्यामुळे दादांविरोधी भूमिका घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील गणपतींचे दर्शन घेतल्यावर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, अजित पवार माझे मोठे बंधू आहेत. अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले आहेत, त्यानुसार मोठय़ा भावाचा मान सन्मान केलाच पाहिजे. मी या संस्कृतीत वाढलेली आहे. मी त्यांच्याविरोधात कोणतीही भूमिका मांडली नाही. तसेच मांडणारही नाही. त्यांच्याविरोधात भूमिका न घेणे हा माझा प्रांजळ प्रयत्न आहे.
मोदी गत 10 वर्षांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. पण आता एनसीपीचा एक गट भाजपसोबत गेल्यानंतर त्यांची टीका बंद झाली आहे. यामुळे त्यांनी केलेले आरोप खोटे होते, खरे होते की राजकीय होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे आरोप खोटे असतील, तर त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तृणमूल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी लोकसभा सभापतींकडे हक्कभंग कारवाईसाठी लेखी पत्र दिले आहे. भाजपच अशा प्रवृत्तीला खतपाणी घालते. ही बाब दुर्देवी आहे, अशी खंत सुळे यांनी व्यक्त केली.
महिला खासदाराबाबतही अपमानास्पद वक्तव्य
नवीन वास्तूत भारतीय संस्कृती, पंरपरेला धरुन राजकारण करावे. संविधानाच्या चौकटीत राहून काम करावे. त्यानंतर देशाला एक चांगला संदेश गेला पाहिजे, असा शब्द आम्ही एकमेकांना दिला होता. चांगल्याप्रकारे कामकाज चालू असताना त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम भाजपच्या असंस्कृत खासदाराने केले आहे. ही पाहिली वेळ नसून अनेकवेळा त्यांनी अशाप्रकारे वक्तव्य केलेले आहे. महिला विधेयक पास करताना महिला खासदाराबाबतही त्यांनी अपमानास्पद वक्तव्य केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
राज्यात कांद्याला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकारला गणपतीने सदबुद्धी द्यावी, असे साकडे मी घातले असल्याचे सुळे यांनी सांगितले.
शरद पवारांना पक्षातून काढले, ही कोणती संस्कृती?
शरद पवारांनी 30 वर्षापूर्वी सामाजिक परिस्थिती पाहून महिला धोरण राज्यात अंमलात आणले. दूरदृष्टीने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आल्याने महिलांना न्याय मिळाला. माझे वक्तव्य कोणाविरोधात नव्हते. मी राजकारणात आजपर्यंत कधी कोणाविरोधात वक्तव्य केले नाही. नोटीस, शिवीगाळ हे आमचे ध्येय नाही. मी व अजित दादा एकमेकांचे विरोधात नाही. पक्ष हा एक विचार आहे. आमचे वैयक्तिक नाते व वैचारिक बैठक यात काही अंतर आले आहे. सत्तेचा गैरवापर करुन मराठी माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. निवडणूक आयोगाला लेखी पत्र आम्ही नाहीतर आमच्यातील काही घटकांनी दिले आहे. देशात पक्षाची ओळख ही शरद पवारांमुळे असून त्यांनी स्वत: पक्ष काढला. 83 व्या वर्षी त्यांना पक्षातून काढण्याचे पाप काहीजण करतात ही कोणती संस्कृती आहे. दिल्लीतील अदृश्य शक्तीचा हात काही घटकाचे मागे असून ते तपास यंत्रणेचा गैरवापर करुन मराठी पक्ष संपविण्याचे काम करत आहेत, असेही सुळे यांनी यावेळी नमूद केले.