अजित पवार हा माझा पुतण्या असून आमच्या पवार कुटुंबात आता वडीलमाणूस मीच आहे. त्यामुळे वडील माणसाला कोण भेटायला आलं आणि वडीलमाणसानं कुणाला भेटायला बोलावल्यास तो चर्चेचा विषय होऊ शकत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. तसेच आम्ही भाजप बरोबर जाण्याचा काही प्रश्न येत नसून आपल्या आणि भाजपमध्ये वैचारिक अंतर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सोलापूर दौऱ्यावर असलेल्य़ा शरद पवार यांच्या उपस्थिती आज माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलतान ते म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या नोटीसला मी उत्तर दिल असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचं त्यांना सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय चौकटीत भाजपशी युती बसत नसल्याने आम्ही कुणीही भाजपसोबत नाही. पक्षातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतलेली असली तरी त्यांच्यात परिवर्तन होण्यासाठी आमचे हितचिंतक सुसंवाद साधायचा प्रयत्न करत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपसोबत कधीच जाणार नाही.” असा दावा शरद पवार यांनी केला.
इंडिया आघाडीवर भाष्य करताना ते म्हणाले, “येत्या ३१ ऑगस्टला आणि १ सप्टेंबरला मुंबईत इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक असून त्याला वेगवेगळ्या पक्षांचे ३० ते ४० नेते उपस्थित राहणार आहेत. यासाठी मी स्वत:, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी नियोजन केले आहे. यामध्ये काही महत्वाच्या प्रश्नावर घेऊन चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची आहे. इंडिया आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद असून भाजप फोडाफोडी करत आहे हे लोकांना पसंत पडत नसल्यानेच सामान्य लोकं मतदानाच्या वेळी निर्णय करतील” असेही शरद पवार म्हणाले.
मणिपूर प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “मणिपूर प्रश्न देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. ईशान्य भारत हा संवेदनशील भाग आहे. संसदेत ईशान्य भारतावर गांभीर्यानं चर्चा व्हायच्या. दुर्दैवानं पंतप्रधानांनी मणिपूरबाबत पुरेसा खुलासा केला नाही. त्यांनी लोकांच्या समस्यांकडे लक्ष न देता राजकीय हल्ले केले ते बरोबर नव्हते.” असंही ते म्हणाले.








