महिलेने जीवनात कधीच घेतले नाही पेनकिलर
‘मर्द को दर्द नहीं होता’ हा फिल्मी डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. परंतु प्रत्यक्षात पुरुष असो किंवा महिला वेदना सर्वांनाच होतात आणि ती दूर करण्यासाठी औषधेही घ्यावी लागतात. परंतु जगात एक अशी महिला आहे, जिला वेदनाच होत नाहीत. या महिलेबद्दल डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करतात.
स्कॉटलंडमध्ये राहणाऱया जो कॅमरून यांना एखाद्या चित्रपटातील सुपरहिरोप्रमाणे जखम झाल्यावरही वेदना जाणवत नाहीत. जो आता सुमारे 75 वर्षे वयाच्या आहेत. वेदना न होण्याची त्यांची स्थिती लोकांना चकित करून सोडणारी आहे. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी आयुष्यात कधीच पेनकिलर्सचे सेवन केलेले नाही.

मुलांना जन्म देतेवेळी आणि ईजा झाल्यावरही त्यांना वेदना जाणवली नव्हती. एवढेच नव्हे तर त्वचा भाजल्यावरही त्यांना वेदना झाली नव्हती. त्वचा जळल्याने येणाऱया दुर्गंधामुळे आपणाला आग लागल्याचे त्यांना कळले होते. याचबरोबर त्यांना कधीच नैराश्य किंवा एंक्झाइटीला तोंड द्यावे लागलेले नाही. त्या कुठल्याच गोष्टीवर पॅनिक होत नाहीत. यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या जेनेटिक म्युटेशनमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे आढळून आले.
अर्थराइटिसमुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, सर्वसाधारपणे अशा स्थितीत लोकांना भयंकर वेदना होत असतात, परंतु जो यांना कुठल्याही प्रकारच्या वेदना जाणवल्या नाहीत. माणसांच्या वेदना कमी करण्याच्या दृष्टीने जो यांच्यावर संशोधन करण्याची योजना डॉक्टरांनी आखली होती. मानवी शरीरात वेदना असणे आवश्यक आहे, कारण शरीरात एखादी समस्या निर्माण झाल्याचे संकेत वेदनांमधून मिळत असतात. वेदनांमुळेच शरीराला औषधांची गरज असल्याचे समजत असल्याचे डॉक्टरांचे सांगणे आहे.









