पुणे / प्रतिनिधी :
काहीजण माझ्यावर टीका करतात की मी आधी असे बोलत होतो, आता तसे बोलतोय. पण अनुभवातून माणसाची मते उमटत असतात. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 रेल्वे स्टेशनसाठी 25 हजार कोटींची तरतूद केली. पहिल्या टप्प्यात 126 स्टेशनसाठी 13 हजार कोटींची तरतूद केली. यापैकी 44 स्थानक महाराष्ट्रातील आहेत. प्रत्येकाला 40 कोटी दिले आहेत. 40 कोटी रक्कम कमी नाही. राज्याचा विकास करण्यासाठी, लोकप्रतिनिधींचे प्रश्न सोडवणे, आपल्या भागाचा कायापालट करण्यासाठी मी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. देशात नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा मजबूत नेता दिसत नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात साखर आयुक्तांबरोबर बैठक घेतली. साखरेच्या प्रश्नांच्या अनुषंगाने ही बैठक संपन्न झाली. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे स्थानके सुधारण्यासाठी योजना सादर केली. त्यात पहिल्या टप्प्यातील 126 स्थानकांमध्ये राज्यातील 44 स्थानके आहेत. त्यांना 40 कोटींचा निधी दिला जाणार आहे. रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळतील. राज्यातील विकास कामे करायची आहेत. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्राधान्याने करायचे आहे. रिंग रोडच्या कामाला गती दिली आहे. पुणे-नाशिक रेल्वेबाबतही अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी तो विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. वीस-बावीस वर्षे होत नसलेले विषय केंद्र सरकार धाडसाने करत आहे.