अध्याय एकोणतिसावा
उद्धव म्हणाला, देवा, योगाभ्यासात एकाग्रता साधून मनाचा निग्रह लवकर होण्यासाठी भक्त तुझी भक्ती करतात. त्यामुळे तू संतुष्ट होतोस. तू संतुष्ट झाल्यामुळे सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांना हा संसार खरा आहे असा भ्रम होत नाही. ह्याप्रमाणे मुखाने तुझे भजन करत असलेल्या भक्ताला निजात्मसुख देऊन त्याला तू तारतोस. त्यातून त्याला कायम टिकणारे सुख प्राप्त झाल्याने तो हरखून जाऊन अतिसंतोषाने डोलू लागतो. ह्याउलट जे तुला शरण येत नाहीत ते मायेने मोहित होतात. जे तुझ्या चरणांकडे पाठ फिरवतात त्यांना स्वप्नातही सुखाचा अनुभव येत नाही. उलट त्यांना चढते वाढते दु:खच भोगावे लागते. तुझ्या चरणांचे ध्यान करायचे सोडून जे योगयागक्रिया किंवा दानधर्म करत बसतात त्यांचे मी कर्ता आहे ह्याचे भान कधीच सुटत नसल्याने त्यांनी केलेली पुण्यकर्मे त्यांनाच बंधनकारक होतात. आम्ही ज्ञानी असून आम्हाला सर्व कळतं, आम्ही योगी असून लोकांना कर्ममार्गाला लावतो. आमचा मार्ग अतिशुद्ध असून ह्या अज्ञानी प्रजेप्रमाणे आम्ही नव्हे. त्यामुळे आमचे वचन म्हणजे आमचे बोलणे सर्वांनी शिरोधार्य मानावे अशी त्यांची इच्छा असते.
अशा पद्धतीने समाजाची दिशाभूल करायला हे लोक सरसावत असतात आणि ज्ञानाच्या अभिमानाने अधिकाधिक मूर्खपणे वागतात. त्यांच्या ज्ञानाचा त्यांना गर्व होतो त्यामुळे त्यांना अत्यंत दु:ख भोगावे लागते. अभिमानासारखा वैरी जगात अन्य कुणीच नसतो. त्यात ह्यांना ज्ञानाचाच अभिमान झालेला मग काय विचारायलाच नको. ते भक्तिपंथ सोडून नाना परीच्या व्यथा केवळ देहाभिमानामुळे सोसत राहतात परंतु जे शहाणे असतात ते मात्र तुला अनन्यशरण येतात. त्यांचे रक्षण करून तू त्यांना तारतोस. त्यांना निजसुख प्रदान करून सुखवतोस. त्यांनी न मागताच त्यांना ब्रह्मज्ञान प्रदान करतोस आणि तुझ्या कृपेने ते त्यांच्या मनात ठसते. तुझ्या भक्तांना विघ्न बाधत नाही ह्यात नवल काहीच नाही. तू भक्ताच्या प्रेमाला भुलून भक्ताच्या आधीन होतोस मग त्यांना मध्यरात्री अन्न पुरवतोस. त्या गडबडीत तुला साधे पालेभाजीचे जेवणसुद्धा मिळत नाही. महाभारतातल्या युद्धात दोन्ही बाजुच्या सैन्याकडून जोरदार शस्त्रांचा मारा होत असताना तू अर्जुनाच्या रथाला स्थिर ठेवलेस. एव्हढेच काय सर्वजण पहात असताना तू त्या रथाची घोडीसुद्धा धुतलीस आणि विशेष म्हणजे असे करताना तुला कोणतीही लाज वाटली नाही. तुला कुणाकडून कसलीही अपेक्षा नाही. तुझ्या आजोबाना, आई वडीलांना बंदिवासात टाकणाऱ्या कंसाचा वध तू केलास. कंस मेल्यामुळे तू सहजासहजी मथुरेचा राजा होऊ शकला असतास पण तसे न करता बंदिवासातून सोडवलेल्या उग्रसेनाला तू राजा केलंस.
पांडवाच्या राजसूर्य यज्ञाच्यावेळी तू अतिथींचे उष्टे काढण्याचे काम मागून घेऊन केलेस. नंदाच्या गायी राखण्यासाठी तू गुराखी झालास. थोरामोठ्यांकरता तू केलेल्या गोष्टी पण गरीब अथवा निर्धन भक्तांवरही तुझे तेव्हढेच प्रेम असते. म्हणून तू गवळ्यांच्या मुलांवरही अत्यंत प्रेम केलेस. त्यांच्याबरोबर राहून त्यांचा उष्टा भात खाल्लास. वेळप्रसंगी त्यांच्याबरोबर आनंदाने डोलून नाचही केलास.
कोणतेही सोवळे ओवळे पाळले नाहीस. त्यांच्या प्रेमाच्या आनंदात न्हाऊन निघालास. तू भक्तकैवारी असल्याने भक्तांच्या अडचणीच्यावेळी धावून जाण्यात तर तुझा हात कोणीच धरू शकणार नाही. वस्त्रहरणाच्या प्रसंगी लाज राख रे बाबा म्हणून द्रौपदीने तुझा धावा केल्याबरोबर तू तिला लुगडी पुरवलीस. डोक्यावर पाण्याने भरलेली घागर घेऊन निघालेल्या गवळणीच्या पायात काटा मोडला म्हंटल्या बरोबर तू तिचे दोन्ही पाय हातात घेऊन अत्यंत मायेने तिच्या तळपायात रुतलेला काटा काढलास. दुर्वास मुनींना खांद्यावरून वाहून नेलेस. दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी बळीचा द्वारपाल झालास असा भक्ताधीन होऊन तू दिलेल्या वचनानुसार भक्तांशी वेळोवेळी वर्तन करतोस.
क्रमश:








