भाजप, संजद समान जागा घेणार, प्रचार जोरात
► वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आल्यानंतर आता खऱ्या अर्थाने या निवडणुकीसाठी सज्जता करण्यास प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्यातच चुरस आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये आता घटकपक्षांच्या जागावाटच्या मुद्द्यावर चर्चा केली जात आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल हे प्रमुख पक्ष आहेत. जागा वाटपात या दोन्ही पक्षांना समसमान जागा लढविण्यास मिळतील, अशी शक्यता आहे. कोणाचेही कोणावर वर्चस्व असणार नाही, असे दोन्ही पक्षांकडून स्पष्ट केले गेले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चार घटक पक्ष आहेत. त्यांच्यापैकी भारतीय जनता पक्ष 103 जागांवर, तर संयुक्त जनता दलही 103 जागांवर लढण्याची शक्यता आहे. चिराग पास्वान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला 25 जागा देण्याची भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे. तर हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोकसमता पक्ष यांना अनुक्रमे 7 आणि 6 जागा दिल्या जातील, अशी माहिती दिली गेली.
जागावाटप सुरळीत होणार
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जागावाटपावरुन कोणतेही मतभेद नाहीत, असे आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट पेले आहे. मतदानाचा प्रथम टप्पा आता महिन्याभरावर आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागा वाटप होईल, असे प्रतिपादन करण्यात आले आहे. बहुतेक जागांसंबंधी मित्रपक्षांमध्ये समझोता झाला आहे. काही जागांसंबंधी वाद असला, तरी तो सोडविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
7 कोटी 40 लाख मतदार
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे या घोषणेसमवेत आदर्श निवडणूक आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. बिहारमध्ये मतदारांची संख्या 7 कोटी 40 लाख इतकी असून त्यांच्यातील 14 लाख मतदार हे प्रथमवेळ मतदार आहेत. ही निवडणूक 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये होणार असून प्रथम टप्प्यात 121 मतदारसंघात, तर द्वितीय टप्प्यात 122 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. एकंदर जागा 243 आहेत. सध्या या राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राज्य असून संयुक्त जनता दलाचे नितीशकुमार मुख्यमंत्री आहेत. नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही मुख्य चुरस राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्यात असून दोन्ही आघाड्यांमध्ये काही छोटे पक्षही आहेत.
‘जात’च महत्वाचा घटक ?
बिहार आणि उत्तर भारतातील बहुसंख्य राज्यांमध्ये निवडणुकीत जात हा महत्वाचा मुद्दा असतो. यंदाही या विधानसभा निवडणुकीत हाच मुद्दा आघाडीवर राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी आघाड्यांनी या मुद्द्यानुसारच उमेदवारी निवडीला प्राधान्य दिले आहे. महागाई, बेरोजगारी आणि इतर मुद्देही महत्वाचे आहेत. निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असे अनुमान आहे.









