भिक्षुगीतेतील रहस्य मनात बाळगले असता साधकांना आपोआपच शांती प्राप्त होते
भगवंत म्हणाले, उद्धवा ज्याला संसाराचे दुःख नष्ट करावयाचे असेल, त्याने मनाचे अवश्य नियमन करावे. कारण, मनाशिवाय दुसरे कोणी दुःख देणारे त्रिभुवनात नाही. मन हे अत्यंत चंचल आहे. ते सहसा स्थिर होत नाही. ह्याकरिता भेदभाव नाहीसा होईल असा मोकळा विचार त्याला रात्रंदिवस करावयास द्यावा. मन हे विवेकाला घुलाटणी देईल, याकरिता मन व विवेक ह्या दोघांनाही हातबेडय़ा घालून रात्रंदिवस एकमेकांजवळ ठेवावे. म्हणजे मन जिकडे विकल्प उत्पन्न करावयाला धावेल, तेथे त्या विकल्पाचा फडशा पाडणारा विवेक तत्परतेने उभा असतो आणि मन जेथे अधर्माकडे वळण्याचा संभव दिसतो, तेथे विवेकही त्याला हाकून देण्याला धावत येतो. मन कामक्रोधापाशी जाऊन बसले की, विवेक त्याचे केस धरून त्याला मागे खेचतो. मन निंदेजवळ गेले की, विवेक त्याला बुकलत असतो. विवेक आणि मनाची जोडी जमून त्यांची एकवाक्मयता झाली की, मनुष्य सदैव आनंदी राहू शकतो हे कसे घडून येते ते मी तुला सविचार सांगतो ऐक, मन ‘मला विषयाकडे जाऊ द्या’ असे म्हणाले, की विवेक त्याच्या मस्तकात वैराग्याची काठी हाणतो. मन कल्पनेच्या पाठीमागे धावू लागले तर विवेक त्याला तत्काळ फेटाळून लावतो. परस्त्री आणि परद्रव्य ह्यांचा अभिलाष करायला मन धावू लागले तर विवेक तेथे जाऊन भयंकर युद्ध सुरू करतो. अशा रीतीने मन आणि विवेक ह्यांचा झगडा लागून त्यांचे गाऱहाणे सदरेपुढे येते. तो त्यांचा न्याय करण्याकरिता अद्वैताच्या वाडय़ात त्या दोघांना कोंडून ठेवतो. ती जागा डोळय़ांनी पाहताच मनाचा स्वभावच नाहीसा होऊन जातो आणि देहातील अभिमान सोडून मन हे विवेकाशी ऐक्मय करते. तेथे मनाचे मनपण नाहीसे होऊन जाते आणि विवेकही मनाला आकलन करण्याचे विसरतो. जीवाचे जीवपण नाहीसे होते आणि अद्वैताच्या योगाने संपूर्ण परब्रह्मच बनते. ज्याप्रमाणे सोन्याचे सर्पाकार अलंकार केले असता त्यांवर नागाच्याच आकाराची फणी, शेपटी, वगैरे शोभत असतात, पण तो नागाच्या आकाराचा दागिना मोडला नाही तरी सोने हे सोन्याच्याच रूपाने असल्यामुळे, तो दागिना पाहणाऱया व्यक्तीला नागाची भीती असत नाही त्याप्रमाणे पूर्णब्रह्म जाणून घेऊन जग हे न मोडताही जीव जीवपणा विसरतो अशा विवेकाच्या युक्तीने मन माझ्या स्वरूपात प्रवेश करते. जेथे मन मनस्वरूपाने उठत नाही, त्याचेच नाव मनोनिग्रह होय. हे चतुरचित्तचिंतामणी! हे विवेकचक्रवर्तिचूडामणी! हे भक्तशिरोमणी उद्धवा! तू मनोनिग्रह करण्याचा प्रयत्न कर. उद्धवाच्या प्रेमाने श्रीकृष्ण अगदी वेडे झाले. ते उध्दवाला म्हणाले, बाबा! तू येथे आदरपूर्वक मनोनिग्रही हो. जो आदरपूर्वक मनाचा निग्रह करून मनापासून उत्पन्न होणाऱया भेदाचा त्याग करितो, त्याला ज्याप्रमाणे लेकराला आई सोडीत नाही, त्याप्रमाणे शांती सोडत नाही. खरी आत्मशांती मनात बिंबली असता त्याला कोणताच भेदभाव पीडा देत नाही. मोठमोठाले सिद्ध व योगी ज्याला ‘योगसंग्रह’ म्हणतात तो हाच. संसाराची स्फूर्ति सोडून चित्स्वरूपाकडे वृत्ती जडते आणि जीव-शिव एकत्र येतात, त्याचेच नाव ‘योगसंग्रहस्थिती’ होय. अशी योगसंग्रहाची शांती प्राप्त झाली असता साधकांना विषय त्रास देत नाहीत. पण हे वर्णन इतकंच पुरे. तात्पर्य इतकेच की, ज्याला या भिक्षुगीताची भक्ती प्राप्त होईल, त्याला द्वंद्वापासून मुक्ती प्राप्त होईल. भिक्षूने गाइलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो, दुसऱयांना ऐकवतो आणि यानुसार वागतो, तो कधीही सुखदुःखादी द्वंद्वाने खचून जात नाही. शांती प्राप्त करून घेण्याकरिता कोटय़वधि साधने केली, तरी शांती प्राप्त होत नाही. परंतु ह्या भिक्षुगीतेतील रहस्य मनात बाळगले असता साधकांना आपोआपच शांती प्राप्त होते. योगनि÷ा आणि ब्रह्मज्ञान, हेच भिक्षुगीताचे निरूपण होय. जो हे लक्षपूर्वक ध्यानात धरतो त्याची शांती ही दासी होते. ह्या भिक्षुगीतेतील गुह्यार्थ जो स्वस्थचित्ताने लक्षात धरितो, त्याला द्वंद्वांची बाधा होत नाही आणि आत्मज्ञानाने तो अत्यंत शांत होतो.
क्रमशः








