आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे स्पष्टीकरण : शिस्तीसाठी सरकार तडजोड करणार नाही
पणजी : गोवा भाजप सरकारात नंबर एक, नंबर दोन असे काहीच नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नेते विकासाचे कार्य पुढे नेत आहोत. आमच्यामध्ये कोणतीच आडकाठी नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभा सभागृहात सांगितले. आरोग्य खाते, वनखाते, नगरविकास खाते तसेच महिला आणि बाल विकास खात्याच्या मागण्यांवर चर्चा झाली. त्यानंतर ह्या खात्याच्या मागण्यांना सभागृहात मान्यता देण्यात आली.
शिस्तीसाठी तडजोड नाहीच
डॉक्टर बरे काम करीत असले तरी शिस्त पाळण्याच्या बाबतीत सरकार कोणतीच तडजोड करणार नाही. सरकारी डॉक्टरांना खासगी प्रॅक्टीस करण्यास मिळणार नाही. यासाठी प्रतिबंध असेल. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र आपत्कालीन सेवा विभाग स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील ऊग्णांचा ताण कमी होईल. गोमेकॉत तसेच आरोग्य खात्यात बदल व सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येईल. ह्या समितीमध्ये मुख्य सचिव तसेच नामांकीत डॉक्टरांचा समावेश असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
दोन क्रिटीकल सेंटर्स स्थापणार
उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी एक अशी दोन क्रिटीकल सेंटर स्थापन करण्यात येतील. याशिवाय प्रस्तावित कर्करोग सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलसमवेत सामंजस्य करार होईल, असेही मंत्री राणे यांनी सभागृहात सांगितले.
लोकांना 108 कडून चांगली सेवा
राज्यातील 108 ऊग्णसेवा चांगले काम करीत आहे. सुरूवातीला 23 ऊग्णवाहिका सेवेसाठी होत्या. आता त्यात वाढ होऊन त्या 100 झालेल्या आहेत. 108 सेवेवर देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण विभाग सुरू करण्यात येईल. मोफत आयव्हीएप उपचार करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. आतापर्यंत 9 मुलांचा आयव्हीएप चाचणीद्वारे जन्म झाला आहे, असे आरोग्यमंत्री म्हणाले.
जमीन रुपांतरणावर काढणार श्वेतपत्रिका
जमीन रुपांतरणावर सरकार व्हाईट पेपर (श्वेतपत्रिका) काढणार आहे. आपण मंत्री होण्यापूर्वी 1 कोटी 50 लाख चौरस मीटर जमीन रुपांतरण झाले आहे. कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात 9.5 कोटी चौ. मी. जमिनीचे रुपांतरण झाले होते. आपल्या कार्यकाळात 16 ते 17 लाख चौ. मी. जमिनीचे ऊपांतरण झाले आहे, असे नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांनी सभागृहात सांगितले.
दोनशे डॉक्टरांची होणार भरती
ज्या आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची उणीव आहे तेथे डॉक्टरांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी 200 डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. कासावली आरोग्यकेंद्रात पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते आणि तेथील डॉक्टरांवर ताण येतो, अशी तक्रार आमदार आंतोन वाझ यांनी केली होती, त्यावर उत्तर देताना राणे बोलत होते. आमदार व्हेन्झी व्हिएगश यांनी यावेळी चर्चेत भाग घेताना सांगितले की, गेल्या तीन वर्षांत राणेंनी कासावली आरोग्य केंद्राला एकदाही भेट दिली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तेथे इतर आरोग्य कर्मचारीदेखील नाहीत. याकडेही व्हिएगश यांनी लक्ष वेधले. आरोग्य केंद्रांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली.









