हिवाळी वेळापत्रक जाहीर
बेळगाव : नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ने विमानांचे हिवाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये बेळगावच्या वाट्याला नवीन कोणतीही विमानसेवा मिळालेली नाही. मागील महिन्यात सुरू झालेल्या दिल्ली व मुंबई या विमानफेऱ्यांवरच बेळगावला मार्च 2024 पर्यंत समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे 10 शहरांनाच विमानसेवा सुरू राहणार आहे. डीजीसीएकडून शनिवारी हिवाळी मोसमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 29 ऑक्टोबर ते 30 मार्च 2024 पर्यंत हिवाळी वेळापत्रक लागू होणार आहे. बेळगावमधून सध्या देशातील महत्त्वाच्या 10 शहरांना विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंडिगो व स्टार एअरलाईन्स बेळगावमधून सेवा देत आहेत. स्टार एअर आठवड्याला 72 ते 75 तर इंडिगो आठवड्याला 70 फेऱ्या विमानसेवा देत आहे. त्यामुळे नवीन विमानफेरी बेळगावच्या पदरात पडली नसली तरी आहे त्याच सेवा उत्तम पद्धतीने चालविणे गरजेचे आहे. सध्या बेळगावमधून 10 शहरांना विमानसेवा दिली जात आहे. बेंगळूर, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, तिरुपती, जोधपूर, जयपूर, सुरत, अहमदाबाद व नागपूर या शहरांना बेळगावमधून विमानाने पोहोचता येते. आठवड्याला 140 ते 150 विमानफेऱ्यांची ये-जा असते. भविष्यात प्रवाशांनी प्रतिसाद दिल्यास विमान फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.









